

ईश्वरपूर : ईश्वरपूर नगरपालिकेचा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर आता सत्ताधारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात उपनगराध्यक्षपद व स्वीकृत नगरसेवक पदासाठी, तर महायुतीत विरोधी पक्षनेते पदासह स्वीकृत नगरसेवक पदासाठीही जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. दोन्ही बाजूकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्याने कोणाची वर्णी लागणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
ईश्वरपूर नगरपरिषदेत 30 जागा पैकी 22 जागा जिंकत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने निर्विवाद सत्ता मिळविली. आता पक्षाचे नेते आ. जयंत पाटील उपनगराध्यक्ष पदाची संधी कोणाला देणार, ते पाहावे लागेल. राष्ट्रवादीच्या 22 नगरसेवकांपैकी खंडेराव जाधव, डॉ. संग्राम पाटील, सुभाष सूर्यवंशी, प्रा. अरुणादेवी पाटील, तर भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले एल. एन. शहा हे नव्या सभागृहात अनुभवी नगरसेवक आहेत. यामुळे यापैकी कोणाही उपनगराध्यक्ष पदासाठी दावेदार ठरणार, की आयत्या वेळी नवे नाव समोर येणार, याबाबत उत्सुकता असणार आहेत.
सध्याच्या संख्याबळानुसार सत्ताधारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला तीन, तर महायुतीच्या वाट्याला एक स्वीकृत नगरसेवकपद येऊ शकते. राष्ट्रवादीकडून पराभूत झालेले शहराध्यक्ष शहाजी पाटील, भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले व थोड्या मताने पराभूत झालेले विजय कुंभार, संग्रामसिंह पाटील यांच्याबरोबरच ज्यांना निवडणुकीत उमेदवारी मिळाली नाही, अशी काही आघाडीवरील नावे स्वीकृतसाठी पुढे येऊ शकतात. शिवाय निवडणुकीत काँग्रेसला सोबत घेताना त्यांना स्वीकृत नगरसेवक पदाचा शब्द जयंत पाटील यांनी दिला होता. तो शब्द पाळला जाणार का, हेही पाहावे लागेल. महायुतीकडून स्वीकृतसाठी अनेकजण इच्छुक असणार आहेत. शेवटच्या क्षणी उमेदवारी मागे घेण्यास लावलेले भाजपचे अमित ओसवाल, शिवसेनेचे सागर मुलगुंडे यांना स्वीकृतचा शब्द देण्यात आला होता. त्यातच आता महायुतीतील प्रमुख नेते विक्रम पाटील, वैभव पवार हे पराभूत झाले आहेत. त्यामुळे स्वीकृतसाठी त्यांचीही नावे पुढे येऊ शकतात.
विरोधी पक्षनेता कोण ?
महायुतीत आता विरोधी पक्ष नेते पदासाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. विरोधी गटातील आठ नगरसेवकांपैकी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार हेच सभागृहातील अनुभवी नगरसेवक आहेत. त्यामुळे या पदावर ते दावा करू शकतात. मात्र शिवसेनेपेक्षा भाजप व राष्ट्रवादीला एक-एक जागा जास्त मिळाल्या आहेत. त्यामुळे तेही विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगू शकतात. मात्र त्यांच्याकडे सर्व नवीन चेहरे आहेत.