

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील रिक्त पदांच्या नोकरभरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असली, तरी परीक्षेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झालेले नाही. त्यामुळे परीक्षा नेमकी कधी होणार, याकडे हजारो इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
बँकेतील अनेक कर्मचारी व अधिकारी वयोमानानुसार निवृत्त झाल्याने मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त झाल्या आहेत. अनेक शाखांचा कारभार अवघ्या एक ते दोन कर्मचाऱ्यांवर सुरू असल्याने दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे. ही अडचण दूर करण्यासाठी बँकेने नोकरभरती जाहीर केली होती. ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी 'आयबीपीएस' या नामांकित संस्थेची निवड केली असून ऑनलाईन अर्ज मागवले होते.
भरती जाहीर झाल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी हरकती घेत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर सहकार विभागाने भरतीला स्थगिती दिली होती. मात्र, बँकेच्या संचालक मंडळाने या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने स्थगिती उठवल्यानंतर भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.