

कुपवाड : शहरातील दत्तात्रय पाटोळे यांच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित नीलेश विठोबा गडदे व त्याचा साथीदार किरण शंकर लोखंडे या दोघांनी जामिनाच्या अटी व शर्तींचा भंग करून विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हे केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. काकडे यांनी दोघांचा जामीन नामंजूर केला आहे. यामुळे या दोन्ही संशयितांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.
दत्तात्रय महादेव पाटोळे यांचा १० जुलै २०२० रोजी कुपवाड-मिरज एमआयडीसी रस्त्यालगत एका कोल्ड स्टोअरेजजवळ मुख्य संशयित नीलेश गडदे व त्याच्या साथीदारांनी धारदार शस्त्राने खून केला होता. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी सर्व संशयित जामिनावर बाहेर आले होते. मात्र, जामिनावर असताना त्यांनी कुपवाड एमआयडीसी, महात्मा गांधी चौक, संजयनगर आणि जत पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध गुन्हे करून न्यायालयाच्या अटी व शर्तींचा भंग केल्याचे उघडकीस आले.
पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, मिरजेचे पोलिस उपअधीक्षक अजय कोकाटे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संजय झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुपवाड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी या प्रकरणात प्रभावी कायदेशीर पाठपुरावा केला. मूळ फिर्यादी चैतन्य सखाराम पाटोळे आणि पोलिसांच्यावतीने संशयितांचा जामीन रद्द करण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने दोन्ही बाजूंची सुनावणी घेत संशयितांचा जामीन रद्द करण्याचा आदेश दिला. या कामकाजात फिर्यादीतर्फे ॲड. रोहित धायगुडे यांनी, तर सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील शैलेंद्र हिंगमिरे यांनी काम पाहिले.