Sangli Crime : डफळापूरप्रकरणी १२५ ते १५० जणांवर गुन्हे

दोन्ही गटाकडून गुन्हे दाखल; पोलिसांवरील हल्ल्यात ६६ जणांसह १०० अनोळखींचा समावेश; २० जण ताब्यात
Sangli Crime News
डफळापूरप्रकरणी १२५ ते १५० जणांवर गुन्हे
Published on
Updated on

जत : तालुक्यातील डफळापूर येथे महापुरुषांच्या जयंतीनिमित्त लावलेला बॅनर काढण्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या गदारोळाचे प्रकरण चांगलेच चिघळले आहे. वरदराज युवराज चव्हाण यांच्या फिर्यादीवरून ३२ जणांवर, तर गणेश ऊर्फ लारा कुमार पाटोळे यांच्या फिर्यादीवरून २९ जणांवर जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, वाद मिटविण्यास गेलेल्या पोलिसांवरही हल्ला झाल्याने पोलिस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण यांच्या फिर्यादीवरून ६६ जणांसह १०० अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत २० जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले यांनी दिली.

वरदराज चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार, बॅनर काढण्याच्या कारणावरून संबंधितांनी घातक शस्त्रांसह बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादीसह सूरज अशोक चव्हाण व विशाल दिनकर चव्हाण यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच मोहन धोंडिराम चव्हाण, देवदास दादासोा चव्हाण व मदन धोंडिराम चव्हाण यांच्यासह सहा जणांना गंभीर दुखापत झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दगड, कुऱ्हाड, काठी, कुकरी व गुप्तीचा वापर झाल्याचेही नमूद आहे.

दुसऱ्या गटाचे गणेश ऊर्फ लारा कुमार पाटोळे यांच्या फिर्यादीनुसार, २९ जणांनी बेकायदेशीर जमाव करून तलवारी, काठ्या व कुऱ्हाडी घेऊन दगडफेक केली. यात फिर्यादीच्या वाहनांसह साक्षीदारांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. दगड लागल्याने पाटोळे यांच्या तोंडाला दुखापत होऊन दात तुटला व ओठाला दुखापत झाली. तसेच नितीन राजाराम मलमे यांच्या कपाळावर तलवारीने वार करून त्यांना गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. ग्रामपंचायतीकडे पळून जात असताना सुनील नाईक यांच्यावरही तलवारीने वार करण्यात आल्याचे म्हटले आहे.

पोलिसांवरही हल्ला

दोन्ही गटातील वाद मिटविण्यासाठी पोलिस घटनास्थळी गेले असता जमावाने पोलिसांवरही हल्ला केला. यात सहायक पोलिस निरीक्षक बिराप्पा लातुरे व पोलिस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण जखमी झाले. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही गटातील ६६ जणांसह १०० अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सशस्त्र जमावाने दंगल करून सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था भंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news