

सांगली : महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना बुधवार, दि. 3 सप्टेंबररोजी प्रसिद्ध होणार आहे. प्रभाग रचना 2018 च्या निवडणुकीनुसार असणार, की काही बदल होणार?, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना गती आली आहे. सर्वच राजकीय पक्षांमधील इच्छुक मंडळी निवडणुकीची तयारी म्हणून गणेशोत्सवात सक्रिय झाली आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे काम जूनमध्ये सुरू झाले. प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव दि. 12 ऑगस्टरोजी नगरविकास विभागाला सादर झाला. तिथून तो राज्य निवडणूक आयोगाला सादर झाला. त्याला मान्यता दिल्यानंतर प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे व त्यावर सूचना, हरकती मागवण्याचा कालावधी दि. 3 ते 8 सप्टेंबर आहे. अवघ्या दोन दिवसात प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्द होणार असल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता ताणली गेली आहे. प्रारूप प्रभाग रचना, प्रभागातील सदस्यसंख्या ही सर्व माहिती प्रशासनाने गोपनीय ठेवली आहे. मात्र जाणकारांच्यामते महापालिकेची 2025 ची निवडणूक ही 2018 च्या निवडणुकीप्रमाणे 4 सदस्यीय प्रभागानुसार आणि 27 टक्के ओबीसी आरक्षणानुसार होईल. त्यामुळे 2018 च्या निवडणुकीतील प्रभाग रचनाच 2025 च्या निवडणुकीत कायम राहील. निवडून द्यायच्या सदस्यांची संख्याही 78 इतकीच असेल. तरीही प्रारूप प्रभाग रचना कशी असेल, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्धीकडे लक्ष लागले आहे.
अजून निवडणूक कार्यक्रम जाहीर व्हायचा आहे. मात्र इच्छुक मंडळी गेल्या तीन महिन्यांपासून चांगलीच सक्रिय झाली आहेत. गणेशोत्सवामध्ये प्रभागातील गणेश मंडळांना वर्गणी, महाप्रसादासाठी आर्थिक साहाय्य, मंडप, डेकोरेशन, साऊंड सिस्टिम तसेच मिरवणूक जल्लोषात होण्यासाठी येणारा खर्च ‘भावी नगरसेवक’ उचलताना दिसत आहे. त्यामुळे त्यांना गणपतीची आरती करण्याचा मान दिला जात आहे. महाप्रसादावेळी भाविकांची भेट घडवून आणली जात आहे. निवडणूक तयारीचे फंडे अवलंबले जात आहेत.