सांगली : पाडव्याच्या मुहूर्तासाठी बाजारपेठेत उत्साह

सवलतींचा वर्षाव : पारंपरिक साड्या, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी
Sangli News
पाडव्याच्या मुहूर्तासाठी बाजारपेठेत उत्साह
Published on
Updated on

सांगली : नववर्षारंभाचा मुहूर्त साधण्यासाठी वस्त्रालंकार, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची बाजारपेठ सजली आहे. ग्राहकांच्यातही पुरेपूर उत्साह असल्याने बाजारपेठेतील सर्वच दुकानात गर्दी आहे. त्यातही सराफपेठ, कापडपेठ सज्ज आहे. मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी गुढीपाडव्याला करण्यासाठी नोंदणी सुरू आहे. सवलतींचा वर्षाव प्रत्येक वस्तू खरेदीवर केला जात असल्याने ग्राहकांनीही संधी साधण्याचा प्रयत्न चालवला आहे.

गुढीपाडव्यानिमित्त नवीन साडी खरेदी करण्याची प्रथा महिला वर्गाकडून जपली जाते. त्यामुळे साड्यांची दुकाने सजली आहेत. पारंपरिक साड्यांना चांगली मागणी असल्याचे साडी विक्रेते गोपाळ तोष्णीवाल यांनी सांगितले. गुढीपाडव्यासाठी नवीन साडी 800 ते पाच हजार रुपयांपर्यंतची खरेदी केली जाते. तीच साडी मुहूर्ताची म्हणून आवडीने परिधान करतात. त्यामुळे पसंतीची आणि चांगल्या प्रतीची साडी खरेदी होते. पैठणी, काठपदराची, बनारसी, धर्मावरम, सॉफ्टसिल्क, कांजीवरम, सेमी पैठणी अशा साड्यांची मागणी अधिक आहे. यावेळी वाईन कलरला महिलांची पसंती आहे. डोला सिल्क साड्यांची अधिक मागणी आहे. बंगळुरू, धर्मावरम, वाराणसी येथून खास गुढीपाडव्यानिमित्त साड्या मागवण्यात आल्याचे तोष्णीवाल म्हणाले.

इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी पाडव्यादिवशी करण्यासाठी दोन दिवसांपासून नोंदणी सुरू आहे. फ्रीज, एसी, वॉशिंग मशीनची नोंदणी ग्राहकांकडून अधिक होत आहे. एसी 30 हजारांपासून पुढे, फ्रीज 15 हजार आणि वॉशिंग मशीन 18 हजार रुपयांपासून पुढे उपलब्ध आहेत. त्यांच्या खरेदीवर विशेष सवलती देण्यात आल्याने यंदा बाजारात उत्साह असल्याचे पिटके सन्सच्या मीनल पिटके यांनी सांगितले.

रेडिमेड गुढ्यांना मागणी

साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त असल्याने या मुहूर्तावर खरेदीचेही नियोजन केले जात आहे. सोने-चांदी-इलेक्ट्रॉनिक वस्तू, फ्लॅट-प्लॉट, कार-मोटारसायकल-संगणक खरेदी या मुहूर्तावर केली जात असल्याने सांगलीच्या सार्‍या बाजारपेठा आता सज्ज झाल्या आहेत. शनिवारी अमावास्या असल्याने गुढीपाडव्याची खरेदी रविवारी सकाळीच वाढणार आहे. बुरूड गल्लीसह सांगलीत मुख्य चौकातून विक्रीसाठी काठ्या रचण्यात आल्या आहेत. रेडिमेड गुढ्यांनाही मागणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news