

कवठेमहांकाळ ः अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानप्रश्नी माजी खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली 14 ऑक्टोबररोजी कवठेमहांकाळ तहसील कार्यालयासमोर जुने बसस्थानक परिसरात शेतकर्यांनी चक्काजाम आंदोलन केले. जिल्हाधिकार्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन आंदोलन केल्याप्रकरणी माजी खासदार संजय पाटील, माजी आमदार विलासराव जगताप, प्रभाकर पाटील यांच्यासह 13 जणांविरोधात 15 ऑक्टोबररोजी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष, उडीद, सोयाबीन आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शासनाकडून अद्याप कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर मंगळवारी कवठेमहांकाळ तहसील कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. याप्रकरणी संजय पाटील (रा. चिंचणी) प्रभाकर पाटील (रा. चिंचणी), विलासराव जगताप (रा. जत), किशोर पाटील (रा. रांजणी), जनार्दन पाटील (रा. बोरगाव), मोहन खोत (रा. विठुरायचीवाडी), खंडू होवाळे, विशाल उर्फ लाला वाघमारे (रा. कवठेमहांकाळ), अजय पाटील (रा. कवठेमहांकाळ), महादेव सूर्यवंशी (रा. कवठेमहांकाळ), रणजित घाडगे (रा. कवठेमहांकाळ, अजित माने (रा. कवठेमहांकाळ), पिंटू माने (रा. कवठेमहांकाळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तपास पोलिस उपनिरीक्षक विनायक मसाळे करीत आहे.
दरम्यान, तासगाव येथेही माजी खासदार संजय पाटील, प्रभाकर पाटील यांच्यासह 11 जणांविरोधात तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेमध्ये संजय पाटील, प्रभाकर पाटील यांच्यासह परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती प्रमोद शेंडगे (पेड), आर. डी. आप्पा उर्फ रवींद्र पाटील (निमणी), माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष जाफर मुजावर, सुदीप खराडे, तासगावचे माजी नगरसेवक माणिकराव जाधव, हेमंत उर्फ हणमंत पाटील (सर्व रा. तासगाव), महेश पाटील (कुमठे) आणि कृष्णा पाटील (लिंब) यांचा समावेश आहे.