Sangli Crime : तरुणीला शीतपेयातून दारू पाजून बलात्कार; दोघा तरुणांना अटक

मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचीही माहिती समोर
Sangli Crime : तरुणीला शीतपेयातून दारू पाजून बलात्कार; दोघा तरुणांना अटक
Published on: 
Updated on: 

ईश्वरपूर : अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला येथील एका लॉजमध्ये शीतपेयातून दारू पाजून तिच्यावर दोघा तरुणांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी घडला. तिला मारहाण करून जिवे मारण्याची धमकीही संशयित तरुणांनी दिली.

याप्रकरणी शार्दुल विद्यापती पाटील (वय २१, रा. रेठरेधरण ता. वाळवा) व प्रथम सचिन पाटील (वय २०, रा. ईश्वरपूर) या संशयितांना ईश्वरपूर पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी शार्दुल याला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, तर प्रथम याला आज, सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पीडित तरुणी ही ईश्वरपूर परिसरात शिक्षणासाठी वास्तव्यास आहे. संशयित शार्दुल आणि प्रथम यांच्याशी तिची ओळख झाली होती. शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास या तरुणीला फसवून दोघांनी एका लॉजवर नेले. तेथे शीतपेयातून तिला दारू पाजली व संशयित शार्दुल आणि प्रथम यांनी तिच्यावर बलात्कार केला. पीडित तरुणी विरोध करत असताना तिला मारहाण केली. हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. बलात्कारानंतर पीडित तरुणीला बसस्थानक परिसरात सोडून संशयितांनी पलायन केले. पीडित मुलीने घडलेला प्रकार घरी सांगितला. त्यानंतर घरच्यांनी आणि पीडित मुलीने पोलिस ठाण्यात धाव घेत दोघांविरोधात फिर्याद दिली.

पोलिसांनी शार्दुल याला शनिवारी रात्री अटक केली होती, तर प्रथम हा फरार होता. पोलिसांनी रविवारी रात्री त्याला घरातून ताब्यात घेतले. पोलिस उपनिरीक्षक एस. डी. ताम्हाणे-बोरावके तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news