

आटपाडी : मिरज येथून दुचाकीवरून करगणी (ता. आटपाडी) येथे घरी निघालेल्या ३६ वर्षीय तरुणाचे आर्थिक वादातून मोटारीमधून अपहरण करण्यात आले. त्याला आटपाडी येथे नेऊन हात-पाय बांधून पाइप, काठ्या आणि लोखंडी गजाने बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना २९ ऑगस्ट रोजी रात्री घडली. याप्रकरणी गुरुवारी आटपाडी पोलिस ठाण्यात सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
जोतिराम शिवाजी गायकवाड (वय ३६, व्यवसाय- ड्रायव्हर, रा. करगणी, ता. आटपाडी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार शिवाजी भगवान पाटील (रा. आटपाडी), रोहन पाटील, शहाजी चव्हाण, रोहित चव्हाण पाटील, संतोष सुधाकर चंदनशिवे व एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोतिराम गायकवाड हे सध्या मिरज येथील इंडियन ऑइल कंपनीमध्ये टँकरचालक म्हणून काम करतात. यापूर्वी २०१७ पासून ते संशयित शिवाजी भगवान पाटील (रा. आटपाडी) याच्या करगणी व भिवघाट येथील पेट्रोल पंपावर गाडी चालवणे व पेट्रोल सोडण्याचे काम करत होते. २०२१ मध्ये स्वतःच्या लग्नासाठी त्यांनी दीड लाख रुपयांची उचल घेतली होती. २०२४ पर्यंत काम करून ती रक्कम पूर्ण फेडल्याचा जोतिराम यांचा दावा आहे. त्यानंतर त्यांनी तेथील काम सोडले.
२९ ऑगस्ट रोजी रात्री ९ च्या सुमारास जोतिराम हे मिरज येथून दुचाकीवरून करगणी येथे घरी जात असताना करगणी येथील जिल्हा बँकेच्या शाखेसमोर थांबले होते. त्यावेळी तेथे पांढऱ्या रंगाची आलिशान मोटार आली. तेथे संशयित शिवाजी पाटील व एका अनोळखीने जोतिराम यांना जबरदस्तीने मोटारीत बसण्यास भाग पाडले. करगणी येथील पेट्रोल पंपावर त्यांची दुचाकी उभी करून त्यांना आटपाडीच्या दिशेने नेले.
आटपाडी येथील श्रीराम कॉलेजसमोर मोटार थांबवून शिवाजी पाटील याने त्याच्या इतर साथीदारांना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर जोतिराम यांना मोटारीमधून खाली उतरवून त्यांचे हात-पाय बांधले आणि कपडे काढून पाइप, काठी तसेच लोखंडी गजाने पाठीत, पोटावर, हातावर, मानेवर व पायावर बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर पहाटे १ वाजण्याच्या सुमारास जोतिराम यांना करगणी येथील पेट्रोल पंपावर सोडून दिले. मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने जोतिराम यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. उपचारानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.