Sangli Crime : पती बेशुद्ध पडल्याचा पत्नीचा बनाव

आनंद सर्जे खुनाचा छडा : पत्नी, प्रियकराला अटक
Sangli Crime News
आनंद सर्जे खुनाचा छडा : पत्नी, प्रियकराला अटक
Published on
Updated on

​सांगली : येथील विठ्ठलनगरमधील पोळ मळा येथे राहणाऱ्या आनंद हणमंत सर्जे (वय ३८) यांच्या खून प्रकरणी, पती घरात अचानक बेशुद्ध पडल्याचा बनाव रचून पोलिसांची दिशाभूल करण्याचा पत्नीचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी मृत आनंद यांची पत्नी पल्लवी आनंदा सर्जे (वय २२) आणि तिचा प्रियकर दीपक आप्पासाहेब आजमाने (वय २१) या दोघांना अटक केली आहे. संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जून रोजी रात्रीच्या सुमारास आनंद सर्जे हे राहत्या घरी अचानक बेशुद्ध पडल्याचे सांगत पत्नी पल्लवी आणि नातेवाईकांनी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत्यूबाबत संशय आल्याने मृतदेह मिरज सिव्हिलमध्ये पाठवण्यात आला. मिरज येथे उत्तरीय तपासणीदरम्यान डॉक्टरांना आनंद यांच्या गळ्यावर संशयास्पद खुणा आढळून आल्या.

या सर्व प्रकाराबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांना संशय आला. त्यानुसार विश्रामबाग पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी संशयावरून पत्नी पल्लवी आणि तिचा मित्र दीपक आजमाने या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करण्यात आली. यावेळी पती आनंद हा सतत दारू पिऊन त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून आम्ही दोघांनी मिळून त्याचा काटा काढण्याचे ठरवले. २५ जूनच्या रात्री आनंद झोपेत असताना त्याचे पाय ओढणीने घट्ट बांधले आणि त्यानंतर हाताने गळा दाबून त्याला जीवे मारले, अशी कबुली त्यांनी दिली. यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित दीपक हा मृत आनंद यांचा जवळचा नातेवाईक असून दोघेही सांगलीत एका नामांकित कपड्याच्या दुकानात काम करत होते.

अंत्यविधीस पत्नीची उपस्थिती

आनंद यांचे मूळ गाव गुड्डापूर (ता. जत) हे आहे. उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईक आनंद यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी गुड्डापूर येथे घेऊन गेले. त्यावेळी पत्नी पल्लवी हीदेखील सोबत होती. मात्र, खुनाचा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी गुड्डापूर येथूनच पल्लवीला ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news