

तासगाव : तासगाव-मणेराजुरी रस्त्यावरील चिंचणी फाटा येथे तासगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत एका संशयित तरुणाकडून दोन पिस्तूल (अग्निशस्त्रे) आणि एक जिवंत काडतूस असा सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सुजल रामचंद्र धनावडे (वय 20, रा. मेढा, ता. जावळी, जि. सातारा) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील पोलिस शिपाई सूरज जगदाळे यांना खास बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, एक तरुण चिंचणी फाटा येथे पिस्तूल विक्रीसाठी येणार आहे. या माहितीची गांभीर्याने दखल घेत सहायक निरीक्षक दीपक पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथकाने परिसरात सापळा रचला. घटनास्थळी एक तरुण संशयास्पद स्थितीत घुटमळताना पोलिसांना दिसला. त्याला पळून जाण्याची संधी न देता पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे एक पिस्तूल आणि जिवंत काडतूस सापडले. अधिक चौकशी केली असता, त्याने आपले नाव सुजल धनावडे असल्याचे सांगितले.
पोलिसांनी कसून तपास केला असता, सुजलने ही शस्त्रे मध्य प्रदेशातील सेंदवा येथील पल्लुसिंग नावाच्या व्यक्तीकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. त्यापैकी एक पिस्तूल त्याने आपल्या मेढा (जि. सातारा) येथील घरी लपवून ठेवले होते. पोलिसांनी तातडीने सातारा जिल्ह्यात जाऊन दुसरे पिस्तूलही हस्तगत केले. ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील, अमित परीट, अमर सूर्यवंशी, सुरेश भोसले, प्रशांत चव्हाण, विठ्ठल सानप, विवेक यादव, सूरज जगदाळे, निलेश डोंगरे, अभिजित पाटील आणि अजय पाटील यांच्या पथकाने केली.