

ईश्वरपूर : ईश्वरपूर पोलिसांनी चार देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि एक मॅगझीनसह 2 लाख 50 हजार रुपये किंमतीचा प्राणघातक शस्त्रसाठा जप्त केला. याप्रकरणी कराड येथील दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी रात्री पेठ (ता. वाळवा) गावाजवळ करण्यात आली. या शस्त्र तस्करी प्रकरणात मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिस उपअधीक्षक अरुण पाटील व निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केली.
सोहेल हारुण तांबोळी (वय 28, रा. मंगळवार पेठ, कराड) व साहिल मोहन मिसाळ (वय 26, रा. कासेगाव ता. वाळवा, सध्या रा. कराड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. सोहेल तांबोळी हा मुख्य सूत्रधार आहे. दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने दोघांनाही सोमवार, दि. 2 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. बुधवारी रात्री 11 वाजता महामार्गावर पेठ-नेर्लेदरम्यान एका पेट्रोल पंपाच्या बाजूला शेतात लपवून ठेवलेला हा शस्त्रसाठा ईश्वरपूर पोलिसांच्या पथकाने पकडला.ृ
पोलिसांचे पथक बुधवारी रात्री पुणे-बंगळूर महामार्गावर गस्तीवर होते. यावेळी त्यांना साहिल मिसाळ हा बेकायदेशीर पिस्तूल विक्रीसाठी पेठनाका ते नेर्ले रस्त्यावर एका पेट्रोल पंपाजवळ आल्याची माहिती मिळाली. पथकाने छापा टाकला असता त्याने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने शिताफीने त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता देशी बनावटीचे चार पिस्तूल, चार जिवंत काडतुसे व एक मॅगझीन मिळून आले. याची किंमत अडीच लाख रुपये आहे. या शस्त्रसाठ्यासंदर्भात त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा मुद्देमाल सोहेल तांबोळी याने आपल्याकडे ठेवण्यास दिल्याचे सांगितले. त्यांनतर पोलिसांनी सोहेल तांबोळी यालाही अटक केली.
मध्य प्रदेश कनेक्शन.....
उपअधीक्षक अरुण पाटील व निरीक्षक सोमनाथ वाघ म्हणाले की, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सोहेल तांबोळी याच्यावर पाच, तर साहिल मिसाळ याच्यावर एक गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता आहे. संशयितांकडे अन्य शस्त्रसाठा आहे का, याचा तपास केला जात आहे. ही शस्त्रे मध्य प्रदेशातून खरेदी केली असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगानेही तपास केला जाणार आहे. ही कारवाई करणाऱ्या पथकाला बक्षीस मिळावे, अशी शिफारस पोलिस प्रमुखांकडे करणार आहे.