

सांगली : रेवनाळ (ता. जत) येथे वृध्दास बोलण्याच्या बहाण्याने थांबवून त्याच्याकडील सोन्याचे दागिने लुटणाऱ्या पंढरपूरमधील भामट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. कारवाईत पोलिसांनी १ लाख २८ हजार ४०० रुपयांचे ९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली १ लाख रुपयांची दुचाकी असा एकूण २ लाख २८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील दुसरा साथीदार फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
रेवनाळ येथील ६९ वर्षीय सयाप्पा ईश्वरा ओलेकर हे शेगाव (ता. जत) येथून रेवनाळ रोडवरील आपल्या शेताजवळ आले असताना, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा बहाणा केला. त्यानंतर सयाप्पा यांच्या गळ्यातील सोन्याचे बदाम, सोन्याची पेटी आणि कानातील हुडकी काढून घेऊन पळ काढला. हवालदार सोमनाथ गुंडे, प्रकाश पाटील आणि पोलिस शिपाई सुनील जाधव यांना तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदारामार्फत हा गुन्हा पंढरपूर येथील आशू जाधव आणि त्याचा साथीदार सोमनाथ पोरे यांनी केल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी संशयित आशू दत्ता जाधव (वय २५, रा. सेंट्रल नाका, भोसले चौक, पंढरपूर) यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने फरार साथीदार सोमनाथ धोंडिराम पोरे (रा. ज्ञानेश्वरनगर, पंढरपूर) याच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. अधिक तपास सुरू आहे.