

ईश्वरपूर : जुनेखेड (ता. वाळवा) येथे पैशाच्या देवघेवीच्या वादातून आई, वडील आणि भावाने मिळून विळ्याने वार करून युवकाचा निर्घृण खून केला. ही घटना सोमवारी रात्री घडली. कपिल झाझम्या पवार (वय ३५, रा. जुनेखेड) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी झाझम्या कस्तान्या पवार (वय ६५), अंजना झाझम्या पवार (वय ६०) आणि अजय झाझम्या पवार (वय ४५) या संशयितांना ईश्वरपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, जुनेखेड येथील बिरोबा मंदिर परिसरात पवार कुटुंब वास्तव्यास आहे. काही दिवसांपासून त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरू होता. सोमवारी सकाळीही पैशाच्या देवाणघेवाणीवरून त्यांच्यात भांडण झाले. रात्री साडेआठच्या सुमारास हा वाद पुन्हा उफाळून आला. या वादातून संशयित झाझम्या, अजय आणि अंजना या तिघांनी कपिलला मारहाण सुरू केली. त्यानंतर संशयितांनी विळ्याने त्याच्या छातीवर आणि हातावर सपासप वार केले. वार वर्मी लागल्याने कपिल रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह गुन्हे प्रगटीकरण शाखेचे पोलिस अमोल सावंत, दीपक गस्ते, शशिकांत शिंदे यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या कपिलला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
ईश्वरपूर पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर अवघ्या काही तासांतच तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेने जुनेखेड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.