

जत : लोहगाव (ता. जत) येथे जुन्या वादाच्या कारणावरून १८ वर्षीय तरुणावर त्याच्याच मित्राने चाकूने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणव बबन सुर्वे (वय १८, रा. लोहगाव, ता. जत) याने दिलेल्या फिर्यादीवरून सतीश तोरणे (रा. लोहगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश तोरणे याने ८ जुलै रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास स्वतःच्या घराजवळ फिर्यादी प्रणव याला बोलावून घेतले. जवळा येथील जुन्या वादाचा राग मनात धरून सतीशने, ‘तू माझ्याशी जवळा येथे का भांडलास?’ असा जाब विचारत शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने आपल्या जवळील चाकूने प्रणवच्या पोटाच्या डाव्या बाजूस वार करून गंभीर जखमी केले. तसेच त्याला लाथाबुक्क्यांनीही मारहाण करण्यात आली.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रणवला त्याची आई आशा व भाऊ प्रथमेश यांनी तातडीने जत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान प्रणवने दिलेल्या जबाबावरून जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.