

सांगली : येथील खणभाग परिसरातील एका ५३ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध ठेवत १० लाख ९८ हजार ३०० रुपयांची फसवणूक केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. एवढेच नव्हे तर विश्वासाने घेतलेली खणभाग येथील फ्लॅटची किल्ली वापरून घरातील चांदीचे दागिने, मोबाईल आणि दुचाकी, असा एकूण २ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. याप्रकरणी सध्या सांगलीत राहणाऱ्या संबंधित महिलेने (मूळ रा. मुंबई) यांनी तिघांविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी मुख्य संशयित अभिमन्यू भगवान जाधव, अभिजित भगवान जाधव आणि भगवान जाधव (सर्व रा. उरुण ईश्वरपूर) यांच्याविरुद्ध फसवणूक, अत्याचार आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. संशयितांनी फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत धक्के मारून घरातून बाहेर काढले.
याबाबत अधिक माहिती अशी, संबंधित महिला ही मुंबई येथे राहण्यास आहे. तिने सांगलीत तीन वर्षांपूर्वी फ्लॅट घेतला आहे. त्या ठिकाणी ती अधुन-मधुन येत असते. मुख्य संशयितही त्या ठिकाणी येत होता. त्यातून त्यांच्यात संबंध निर्माण झाले. त्यांनी महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. वेळोवेळी तिच्याकडून पैसे मागून घेतले. मात्र त्यांनी नंतर भेटण्यास टाळाटाळ सुरू केली. यामुळे संबंधित महिलेने पोलिसात तक्रार दिली असून तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.