​Vedant murder case : नीलेश गडदेला चार दिवस पोलिस कोठडी

इतर संशयितांचा शोध सुरूच : स्वतःच्याच बंदुकीतून गोळीबार केल्याची कबुली
​Vedant murder case
नीलेश गडदेला चार दिवस पोलिस कोठडी
Published on
Updated on

सांगली : आरग (ता. मिरज) येथील रेल्वे मालधक्क्यावरील ठेका आणि खंडणीच्या वादातून १४ वर्षीय निष्पाप बालक वेदांत बाळू बंडगर या बालकाचा गोळ्या झाडून खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार व नामचीन गुंड नीलेश विठोबा गडदे याला सोमवारी जिल्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून प्राथमिक चौकशीत त्याने स्वतःच्याच बंदुकीतून गोळीबार केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. न्यायालयाच्या आवारात त्याला आणण्यात आले, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर या क्रूर कृत्याची थोडीसुद्धा शरम दिसून आली नाही. यावेळी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

आरग येथील मालधक्क्याचे काम लक्ष्मण खरात यांच्याकडे आहे. खरात यांनी ते काम सोडावे आणि १० लाख रुपयांची खंडणी द्यावी, यासाठी नीलेश गडदे दबाव आणत होता. यावरून बुधवारी त्याने खरात यांच्या घरात घुसून त्यांच्या पत्नीला धमकावले. या घटनेनंतर जत पोलिस ठाण्याबाहेर हमाल पंचायतचे नेते, कार्यकर्ते जमा झाले असता दोन्ही गट समोरासमोर आले. संतप्त हमालांनी गडदे समर्थकांच्या वाहनावर दगडफेक केली. याच रागातून हमाल नेते बाळासाहेब बंडगर यांना मारण्यासाठी गडदेने सांगली गाठली आणि अंगणात मोबाईल पाहत बसलेला त्यांचा नातू वेदांत याच्यावर थेट गोळी झाडून त्याची निर्घृण हत्या केली.

या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक संजीव झाडे आणि उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकाने मोठी यंत्रणा राबवून कर्नाटक सीमाभागातील एका लॉजवरून गडदेला ताब्यात घेतले. या गुन्ह्यात यापूर्वी अतुल वायदंडे याला अटक करण्यात आली आहे. आता पोलिस निरीक्षक झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथके फरार असलेले इतर संशयित व या कटात सामील असणाऱ्या आणखी दोन संशयितांचा शोध घेत आहेत.

हत्या केल्यानंतर महालक्ष्मी दर्शन

पोलिसांनी सांगितले की, सांगलीत वेदांतची हत्या केल्यानंतर नीलेश गडदे जयसिंगपूर येथे गेला. तिथून तो कोल्हापूर येथे गेला. कोल्हापुरात त्याने महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर तो एका दर्ग्यातील बाबास भेटण्यासाठी गेला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news