वसंत सावंत
जत : जत तालुक्यातील लकडेवाडी आणि भिवर्गी या दोन गावांमध्ये अवघ्या काही दिवसांच्या अंतराने घडलेल्या दोघांच्या मृत्यूने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. या दोन्ही घटनांचा धागा दारूच्या व्यसनाशी आणि त्यातून निर्माण झालेल्या हिंसक वादांशी जोडला गेला आहे. एकाच महिन्यात दोन बळी गेल्याने अवैध दारूचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
लकडेवाडीतील शोकांतिका
लकडेवाडी येथे 28 मे रोजी घडलेली घटना एका कुटुंबाच्या दीर्घकाळ चाललेल्या वेदनेची परिणती आहे. खंडू श्रीमंत भिसे हे दारूच्या नशेत पत्नीला वारंवार मारहाण करीत. घटनेच्या दिवशीही घरातील संसारोपयोगी साहित्य बाहेर फेकल्याने वाद वाढला आणि संतप्त झालेल्या मुलानेच वडिलांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा जीव घेतला. या घटनेमुळे वडिलांचा मृत्यू झाला, तर मुलाचे आयुष्य कारागृहात जाणार. यामुळे कुटुंब उद्ध्वस्त झाले.
भिवर्गीतील तरुणाचा मृत्यू
11 मे रोजी भिवर्गी येथे दारूच्या नशेत झालेल्या भांडणातून 25 वर्षीय महादेव बिरादार यांचा मृत्यू झाला. किरकोळ वादाचे रूपांतर मारहाणीत झाले आणि त्यात गंभीर दुखापत झाल्याने या तरुणाला आपला जीव गमवावा लागला. या दोन घटनांवरून, दारूची नशा माणसाच्या विवेकबुद्धीवर परिणाम करून हिंसाचाराला कशी खत-पाणी घालते, हे स्पष्ट झाले आहे.
वाढती अवैध दारू विक्री चिंतेचा विषय
जत तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवैध दारू विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी खुलेआम दारू विक्री होत असतानाही ठोस कारवाई होत नाही.
केवळ छापे नव्हे, जनजागृतीही गरजेची
पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची कठोर कारवाई आवश्यक आहे. मात्र, केवळ
छापे टाकून हा प्रश्न सुटणार नाही. जनजागृतीचीही तितकीच गरज आहे.