.jpeg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpeg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
कुपवाड : मिरज ते तासगाव रस्त्यावरील मानमोडी हद्दीत असलेल्या प्लायवूड कंपनीतून मध्य प्रदेशातील शहाडोल येथे पाठवण्यासाठी भरलेले १० लाख रुपये किमतीचे प्लायवूड परस्पर लांबवून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील अरिहंत ट्रान्स्पोर्टच्या संचालकाने हा माल मूळ ठिकाणी न पोहोचवता स्वतःच्या फायद्यासाठी ठेवून घेतल्याचा आरोप करत, इनामदार ट्रान्स्पोर्टच्या संचालकांनी कुपवाड पोलिसांत कारवाईसाठी निवेदन दिले आहे.
रुकमुद्दीन घुडूसाहेब इनामदार यांनी कुपवाड पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुण्यातील अरिहंत ट्रान्स्पोर्टच्या संचालकाने २५ एप्रिल २०२६ रोजी माझ्याशी संपर्क साधून शहाडोल (मध्य प्रदेश) येथे माल वाहतुकीसाठी गाडी उपलब्ध असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांच्या ट्रकची (क्र. एमएच ४१ एयू २६७५) व चालकाच्या कागदपत्रांची खात्री करून मानमोडी हद्दीतील कंपनीतून १० लाख रुपयांचे ३० टन प्लायवूड ट्रकमध्ये भरून दिले आणि गाडी रवाना केली.
त्यानंतर २६ एप्रिलरोजी ट्रकचे लोकेशन तपासले असता, तो चुकीच्या मार्गाने जात असल्याचे निदर्शनास आले. चालकाशी संपर्क साधला असता, ट्रकचे पासिंग करायचे असल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, २८ एप्रिल रोजी अरिहंत ट्रान्स्पोर्टच्या संचालकाने इनामदार यांच्याकडे ॲडव्हान्सची मागणी केली. त्यावर, शहाडोल येथे ठरलेल्या ठिकाणी माल पोहोच झाल्यावर पूर्ण पैसे देतो, असे इनामदार यांनी स्पष्ट केले.
काही वेळाने संबंधित ट्रक चालकाने, अरिहंत ट्रान्स्पोर्टच्या संचालकाच्या दोन साथीदारांनी संगमनेर बायपास येथे हा सर्व माल दुसऱ्या ट्रकमध्ये भरून नेल्याची माहिती इनामदार यांना दिली. या प्रकारानंतर इनामदार यांनी अरिहंत ट्रान्स्पोर्टच्या संचालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा मोबाईल बंद होता. शंका आल्याने इनामदार यांनी पुणे येथे अरिहंत ट्रान्स्पोर्टच्या पत्त्यावर खात्री केली, तेव्हा असे ट्रान्स्पोर्ट अस्तित्वातच नसल्याचे दिसून आले. कुपवाड पोलिस पुढील तपास करत आहेत.