Sangli News : पिकअपमधून लाखांची रोकड पळवणारे चोरटे जेरबंद

दोघा संशयितांसह मुद्देमालही हस्तगत : कडेगाव पोलिसांची कारवाई
Sangli News
पिकअपमधून लाखांची रोकड पळवणारे चोरटे जेरबंद
Published on
Updated on

कडेगाव शहर : कडेगाव शहरात भरदिवसा पिकअप गाडीतून एक लाख रुपयांची रोकड पळवणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा छडा लावण्यात कडेगाव पोलिसांना अवघ्या काही दिवसांत यश आले आहे. याप्रकरणी सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दोन संशयित संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीला गेलेली एक लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.

दत्ता तुकाराम खांडेकर (वय ३०, रा. हणमंतगाव, ता. सांगोला, जि. सोलापूर) आणि जीवन आनंद चव्हाण (वय ३३, रा. आनंदनगर कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमित भास्कर कोठावळे (रा. गांधीनगर, कोल्हापूर) हे शुक्रवारी (दि. १०) सकाळी साडेदहाच्या सुमारास कडेगाव येथील तहसील कार्यालय रस्त्यावरील एका रेडीमेड कपड्यांच्या दुकानासमोर आले होते. त्यांनी त्यांच्या ताब्यातील पिकअप गाडीच्या (क्र. एमएच ४६ बीएम ३९८) क्लिनर साईडच्या सीटखाली एका बॉक्समध्ये एक लाख रुपयांची रोकड ठेवली होती. ही संधी साधून चोरट्यांनी गाडीतील १ लाख रुपयांचा बॉक्स लंपास केला होता. याप्रकरणी कोठावळे यांनी कडेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून कडेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधीर तोरडमल यांनी तातडीने तपास पथक नियुक्त करून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. तपास अधिकारी तथा पोलिस उपनिरीक्षक विनायक कुंभार व त्यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीवरून दत्ता खांडेकर व जीवन चव्हाण यांना ताब्यात घेतले.

पोलिसी खाक्या दाखवताच संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली. दोघांकडून चोरीची संपूर्ण १ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून, कडेगाव पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news