Sangli News : कतलीसाठी गाई घेऊन जाणारा टेम्पो पकडला

मणेराजुरी हद्दीतील घटना; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
Cattle Smuggling
Cattle SmugglingPudhari
Published on
Updated on

तासगाव : मणेराजुरी ते तासगाव रस्त्यावर अपघातग्रस्त टेम्पो कतलीसाठी गाई घेऊन जात असताना पोलिसांनी पकडला. पाच गाई व टेम्पो असा सहा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. पोलिस शिपाई हणमंत तानाजी गवळी यांनी या प्रकरणी तासगाव पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. सौरभ बापूसोा सकटे ( वय २५, रा. बनेवाडी ता, वाळवा) असे अटक केलेल्या टेम्पो चालक संशयिताचे नाव आहे.

या बाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी : संशयित सौरभ सकटे हा शुक्रवारी रात्री उशिरा त्याच्या ताब्यातील टेम्पो (एम एच १० डी टी ६८५१ ) मधून २ लहान देशी गाई, ३ जर्सी जातीच्‍या काळे पांढरे रंगाच्या गाई अशा ५ गाईंना मणेराजुरीकडून बनेवाडीकडे घेऊन जात होता. त्याचा टेम्पो मणेराजुरी ते तासगाव रस्त्यावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ आला असता टेम्पो रस्त्याकडेला घसरला. यावेळी शेजारील तरुण, अपघात झाला असल्याचे समजून घटनास्थळी जमले असता त्या टेम्पोत कतलीसाठी गाई घेऊन चालले असल्याचे दिसून आले. घटनेची माहिती तरुणांनी पोलिस पाटील दीपक तेली यांना दिली. तेली यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली असता पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी टेम्पोची पाहणी केली असता टेम्पोत गाईंना त्यांचे तोंड घट्ट दोरीने बांधून हौद्यात दाटीवाटीने भरले असल्याचे दिसून आले. गाईंना कोणत्याही प्रकारे चारा, पाणी व प्राथमिक उपचाराची व्यवस्था न करता नेले जात होते.

तसेच जनावरे वाहतुकीचे प्रमाणपत्र त्याच्याकडे आढळून आले नाही. या गाई बेकायदेशीररित्या कत्तलखान्याकडे कत्तल करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असल्याचे दिसून आले. टेम्पोतील एका गाईस गंभीर दुखापत होऊन गंभीर होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी जबाबदार धरून सौरभ सकटे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

logo
Pudhari News
pudhari.news