

सांगली : सांगली शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पानपट्ट्या पटाटा बंद होत आहेत. पानपट्टीच्या नावाने भलताच उद्योग करणाऱ्या या पानपट्ट्या कारवाईच्या भीतीने बंद होत असल्याची चर्चा आहे. काही ठिकाणी काहींनी पानपट्ट्या बंद करण्याचा मार्ग स्वीकारला आहे, तर काहींनी बंदी असल्याने ‘नो गुटखा’ धोरण स्वीकारत केवळ पानपट्टी सुरू ठेवली आहे.
राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर भेसळखोरांचे धाबे दणाणले आहे. राज्यभर ठिकठिकाणी अन्नपदार्थांमधील भेसळीवर छापे टाकून धडक कारवाया करण्यात येत आहेत. यात अनेकांना अटक झाली, अनेक दुकानांना सील ठोकले आहे. अवघ्या सहा दिवसात राज्यात दोनशेहून अधिक कारवाया झाल्या. शंभराहून अधिक जणांना अटक करण्यात आली. याचे पडसाद जिल्ह्यात उमटत आहेत.
मुंढे यांच्या बडग्याने सांगलीतील अन्न व औषध प्रशासन विभागाला (एफडीए) जाग आली आणि जिल्ह्यातही कारवाया सुरू झाल्या. इतके दिवस हा विभाग कोठे होता आणि नेमके काय करत होता? कायद्याचा आदर करणारा, तसे वागणारा एक खमक्या अधिकारी काय करू शकतो आणि त्याचे परिणाम किती दूरवर उमटतात, हे यानिमित्ताने पाहावयास मिळत आहे.