

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ पोलिसांनी विठुरायाचीवाडी व अग्रण धुळगाव येथील विहिरीतील मोटारींच्या केबलची चोरी करणाऱ्या चारजणांच्या टोळीच्या मुसक्या झुरेवाडी (ता कवठेमहांकाळ) येथून आवळत त्यांच्याकडून १ लाख ५० हजार रुपये किमतीची चोरीची केबल जप्त केली आहे. चारजणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिस शिपाई अभिजित कासार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली श्रीमंत करे, नागेश मासाळ, निवृत्ती करांडे यांचे पथक झुरेवाडीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी संशयास्पदरित्या फिरणाऱ्या राजकुमार श्याम गोसावी (वय २२), प्रवीण तानाजी गोसावी (वय २५), राहुल श्याम गोसावी (वय १९) आणि अरविंद तानाजी गोसावी (वय २४, सर्व रा. ज्ञानगिरी वसाहत, सावळी, ता. मिरज) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
चार संशयितांना पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली असता चौघांनी विहिरीतील मोटारींच्या केबलची चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीला गेलेली केबल हस्तगत करण्यात आली आहे.