Sangli Crime : नामचीन गुंड नीलेश गडदेच्या मुसक्या आवळल्या

कर्नाटक सीमेवरील एका लॉजवरून अटक; अन्य संशयितांच्या मागावर पोलिसांची पथके
Sangli Crime News
नामचीन गुंड नीलेश गडदेच्या मुसक्या आवळल्या
Published on
Updated on

सांगली : रेल्वे मालधक्क्यावरील ठेका व खंडणीच्या वादातून निष्पाप वेदांत बंडगर या १४ वर्षीय मुलाचा खून करणाऱ्या नीलेश गडदे या नामचीन गुंडाच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला यश आले. महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवरील लक्ष्मीवाडी येथील एका लॉजवरून त्याला अटक करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, त्याच्या अन्य साथीदारांच्या मागावर पोलिसांची पथके असल्याचे सांगण्यात आले. या खूनप्रकरणी यापूर्वी अतुल वायदंडे या गुन्हेगाराला अटक केली होती, तर मुख्य संशयित नीलेश विठोबा गडदे, किरण शंकर लोखंडे, विशाल बिरदेव चौगुले आणि नानासाहेब ऊर्फ सागर माणिक चौगुले पसार होते.

आरग येथील मालधक्क्यावरील ठेकेदार लक्ष्मण खरात यांनी मालधक्क्यावरील ठेका सोडावा, अन्यथा दहा लाख रुपयांची खंडणी द्यावी, यासाठी नीलेश या नामचीन गुंडाने जत तालुक्यातील बाज येथे लक्ष्मण खरात यांच्या घरात घुसून त्यांच्या पत्नीला व मुलांना धमकी दिली होती. त्यांच्या पत्नीला, तुमच्या नवऱ्याला आरग येथील मालधक्क्यावरील ठेका सोडायला सांगा, अन्यथा मला दहा लाख रुपये खंडणी द्यायला सांगा, अशी धमकी दिली होती. तसेच लक्ष्मण यांच्या मुलांना देखील, बाप जिवंत हवा असेल तर त्याला पैसे द्यायला सांगा, असे धमकावून नीलेश हा त्यांच्या घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर त्याने एका चौकामध्ये हवेत गोळीबार करत दहशत निर्माण केली होती.

नीलेश याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी ठेकेदार बाळू बंडगर व सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संचालक मारुती बंडगर, लक्ष्मण खरात यांच्या मदतीला धावले होते. नीलेश याच्याविरुद्ध फिर्याद देण्यासाठी मारुती बंडगर व लक्ष्मण खरात गुरुवारी जत पोलिस ठाण्यात गेले होते. याचा राग धरून नीलेशने काही साथीदारांच्या मदतीने जत पोलिस ठाण्याबाहेर धिंगाणा घालत हवेत गोळीबार केला होता. यातून लक्ष्मण खरात यांच्या समर्थकांनी नीलेश याच्या वाहनावर दगडफेक करून वाहनाची तोडफोड केली होती.

या रागातून नीलेश गुरुवारी सायंकाळी बाळू बंडगर यांच्या घरात गेला. व घराबाहेर मोबाईलवर गेम खेळणारा त्यांचा नातू वेदांत याच्या शर्टाच्या कॉलरला पकडून त्याच्या डोळ्यात गोळी झाडून त्याची हत्या केली. यानंतर नीलेश टोळीसह पसार झाला होता. अखेर तो एका लॉजवर असल्याची खबर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे, उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकाला लागली. त्यांनी सापळा रचला व अटक केली. त्याला आज, सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

खुनाचे दोन गुन्हे

नीलेश गडदे याच्यावर दोन खुनाचे गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याने २०२० मध्ये कुपवाड एमआयडीसी परिसरात एकाचा खून केला होता. तसेच खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, जमाव जमवणे, मालमत्तेचे नुकसान करणे असे त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत.

मैत्रिणीसोबत लॉजवर

वेदांत बंडगर याचा खून केल्यानंतर नीलेश गडदे हा त्याच्या मैत्रिणीसोबत एका लॉजवर गेला होता. दोन दिवस त्याने त्याच लॉजवर मुक्काम ठोकल्याची देखील माहिती समोर येत आहे. ही माहिती समजल्यानंतर पोलिसांनी लॉजवर छापा टाकल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर निष्पाप बालकाच्या खुनाचा लवलेशही दिसून आला नाही! पोलिसांनी बेळगाव, पुणे, सोलापूर इत्यादी ठिकाणी छापे टाकले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news