Vedant Bandgar murder case : गडदे टोळीवर ‘मोका’

सांगलीसह कर्नाटकात धुमाकूळ घालणाऱ्या ९ गुंडांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Vedant bandgar murder case
Vedant bandgar murder case
Published on
Updated on

सांगली : शहरातील वेदांत मारुती बंडगर या १४ वर्षांच्या बालकाच्या खळबळजनक हत्या प्रकरणातील सराईत गुंड नीलेश गडदे याच्यावर संघटित गुन्हेगारी टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यास विशेष पोलिस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी मंजुरी दिली आहे. या कारवाईमुळे सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारी जगताला मोठा हादरा बसला असून, टोळी प्रमुखासह एकूण ९ जणांवर मोकाचा बडगा उगारण्यात आला आहे. यामध्ये एका बाल गुन्हेगाराचाही समावेश आहे.

संजयनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खून आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याच्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे करत होते. तपासादरम्यान नीलेश विठोबा गडदे (रा. वाघमोडेनगर, कुपवाड) या टोळी प्रमुखाने किरण शंकर लोखंडे (वय २५, रा. कुपवाड), विशाल बिरुदेव चौगुले, नानासाहेब ऊर्फ सागर माणिक चौगुले (दोघे रा. पिंपळवाडी, कवठेमहांकाळ), अतुल दादासाहेब वायदंडे (वय २८, रा. खंडेराजुरी, मिरज), संदेश ऊर्फ सँडी रामचंद्र घागरे (वय २३, सध्या रा. कुपवाड), मलिक सलीम शेख (रा. दत्तनगर, कुपवाड), महंमद जमाल नदाफ (वय ४२, रा. अभयनगर, सांगली) आणि एका बालगुन्हेगाराला सोबत घेऊन 'एन. जी. ग्रुप' नावाने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केल्याचे निष्पन्न झाले.

या टोळीतील सदस्य स्वतःच्या उपजीविकेसाठी २०१७ पासून ते २०२६ पर्यंत सांगली जिल्ह्यात तसेच शेजारील कर्नाटक राज्यातील बेळगाव व बागलकोट जिल्ह्यांत गुन्ह्यांची मालिकाच सुरू केली होती. समाजात स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी या टोळीने खून, खुनाचा प्रयत्न, प्राणघातक हल्ला, खंडणीसाठी अपहरण, विनयभंग, बेकायदेशीर शस्त्रे व अमली पदार्थांची तस्करी यांसारखे अनेक गंभीर गुन्हे केले असून परिसरात मोठी दहशत निर्माण केली होती.

या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी सरकारी अभियोक्ता ज्योती डाके यांच्या अभिप्रायानुसार मोका कायद्याची वाढीव कलमे लावण्याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्यामार्फत विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे सादर केला होता. या प्रस्तावाचे गांभीर्य ओळखून विशेष पोलिस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी या ९ जणांवर मोका लावण्यास परवानगी दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास शहर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप भागवत करत आहेत. या कारवाईमुळे सांगलीतील संघटित गुन्हेगारीचा कणा मोडला असून, अशा टोळ्यांवर यापुढेही कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news