

जत : जत तालुक्यातील पांडोझरी तांडा येथे बेकायदेशीर हातभट्टी दारू निर्मितीच्या रसायनावर उमदी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या छाप्यात सुमारे १६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी एकावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमदी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, ६ जून २०२६ रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पांडोझरी तांडा येथे बाळू रामू चव्हाण (वय ५५, रा. पांडोझरी तांडा, ता. जत) हा आपल्या घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत बेकायदेशीरपणे हातभट्टी दारू तयार करण्यासाठी रसायन साठवून ठेवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे उग्र वासाचे ४०० लिटर रसायन आढळून आले. या रसायनाची अंदाजे किंमत १६ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी हे रसायन घटनास्थळी जप्त केले असून, चव्हाण याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(इ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.