

मिरज : सांगलीत आणखी एका संशयिताकडून गोवा बनावटीची सुमारे दोन लाख रुपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्कच्या मिरज विभागाने ही कारवाई केली.
दैनिक ‘पुढारी’ने दिलेल्या विशेष वृत्तामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग अलर्ट मोडवर आहे. जिल्ह्यात सर्वत्र बेकायदा दारू विक्री संदर्भात कारवाई सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर विभागाचे विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर यांनी दैनिक ‘पुढारी’च्या वृत्ताच्या उल्लेख करून सांगली जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले होते. सांगलीचे अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या सूचनेनुसार दोन दिवसांपूर्वी सांगलीत गोवा बनवटीचा दारूचा साठा जप्त करण्यात आला होता.
सांगलीच्या नवीन वसाहत येथे, अग्निशामक दलासमोर, विशाल पवार याच्या राहत्या घरामध्ये छापा टाकून विविध ब्रॅण्डचा विदेशी मद्यसाठा मिळून आल्याने या ठिकाणी महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करुन कारवाई करण्यात आली होती. विशाल पवार याची कस्टडी रिमांड घेण्यात आली होती. तपासामध्ये दत्तात्रय भीमराव बंडगर (रा. संजयनगर सांगली) या संशयिताचे नाव निष्पन्न झाल्याने त्यास दि. ८ रोजी अटक करून त्याचीही कस्टडी रिमांड घेण्यात आली. विशाल पवार हा न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. दत्तात्रय बंडगर याच्याकडून मोबाईल व प्लॅस्टिक बुचे, असा ५७८३ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दत्तात्रय बंडगर याच्याकडे तपास केला असता १०० फुटी रोडवर असलेल्या ऑटो गॅरेजमध्ये लावलेल्या मोटारीत (एमएच ०८, एएन ८१७१) गोवा राज्यनिर्मित विदेशी मद्यसाठा (किंमत २ लाख ३ हजार ३७० रुपये, प्लॅस्टिक बुचे (किंमत ५० हजार २९२ रुपये) व पाच लाख रुपये किमतीचे वाहन, असा एकूण ७ लाख ५३ हजार ६६२ रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण ८ लाख ९२ हजार ७९५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.