

जत : जत शहरातील शंकर कॉलनी परिसरातील निवृत्त शिक्षक नीलकंठ स्वामी यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना मंगळवारी रात्री सव्वातीन वाजण्याच्या सुमारास घडली.
नीलकंठ स्वामी हे आपल्या कुटुंबासह शंकर कॉलनीत राहतात. पत्नी आजारी असल्याने त्यांना सांगली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी स्वामी मंगळवारी सकाळी घराला कुलूप लावून गेले होते. त्यामुळे घरात कोणीही नव्हते. हीच संधी साधून चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी बेडरूममधील २५ हजार रुपयांची रोकड, ५ तोळ्यांचे चांदीचे दागिने आणि देवघरातील १२ तोळ्यांची चांदीची लक्ष्मीची मूर्ती असा एकूण सव्वा लाखाचा ऐवज चोरून नेला.
बुधवारी सकाळी शेजाऱ्यांना स्वामी यांच्या घराचे दार उघडे असल्याचे दिसल्याने चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तातडीने याची माहिती स्वामी कुटुंबाला दिली. याप्रकरणी नीलकंठ स्वामी यांचा मुलगा प्रज्वल स्वामी याने जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास सुरू आहे.