

ईश्वरपूर : औषधोपचार घेऊन गावी परतणार्या पती-पत्नीच्या दुचाकीला पेठनाका (ता. वाळवा) येथे पाठीमागून येणार्या डंपरने जोराची धडक दिल्याने अपघातात पतीचा जागीच मृत्यू झाला. विलास शिवाजी थोरात (वय ४५, रा. ओंड, ता. कराड) असे मृत पतीचे नाव आहे. त्यांच्या पत्नी राणी थोरात या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हा अपघात शनिवारी दुपारी घडला. अपघातानंतर डंपर चालकाने पलायन केले. याप्रकरणी डंपर चालकाविरोधात ईश्वरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विलास यांचे मावसभाऊ बाळासाहेब शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.
विलास थोरात हे पत्नी राणी यांच्यासह दुचाकीवरून (एमएच ३१ एटी ६७५३) ईश्वरपूर येथे औषध घेण्यासाठी गेले होते. औषध घेऊन ओंड गावाकडे परत जाण्यासाठी ते निघाले होते. दुपारी पेठनाका येथील पुलाखालून कराडच्या दिशेने वळण घेत असताना, पाठीमागून येणार्या डंपरने (एम१०, डीटी ९६६०) त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. धडकेनंतर दोघेही रस्त्यावर कोसळले. विलास थोरात यांच्या उजव्या पायाला, डोक्याला गंभीर मार लागला, तर राणी थोरात यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. तातडीने जखमींना कराड येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, विलास यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.