

सांगली : अंकली (ता. मिरज) येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या खुनीहल्ल्यातील जखमीचा सोमवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. शीतल धनपाल पाटील (वय 25, रा. अंकली) असे मृताचे नाव आहे. घटनेनंतर जमाव संतप्त झाला. संशयितांवर कारवाईची मागणी करत स्मशानभूमीत नेलेला मृतदेह पुन्हा संशयितांच्या घरासमोर आणून ठेवला. पोलिसांनी तिघांना अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती दिल्यानंतर, तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगळवारी गाव बंद ठेवण्यात आले.
शीतल पाटील याच्या खूनप्रकरणी विकास बंडू घळगे (35), क्षितिज ऊर्फ आप्पा शशिकांत कांबळे (28) आणि आदित्य शंकर घळगे (22, सर्व रा. अंकली) यांना अटक झाली आहे. अनंत चतुर्दशीनिमित्त अंकलीतील जैन बस्तीजवळून विसर्जन मिरवणूक निघाली होती. सराईत गुन्हेगार आदित्यसह अन्य दोघे नाचण्यासाठी मिरवणुकीत आले. मंडळाचे सदस्य सुनील पाटील यांनी त्यांना मिरवणुकीत नाचू नये, असे सांगितले. संशयितांनी त्यांनशा मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांचा पुतण्या शीतल याने भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. क्षितिज याने चाकूने शीतल याला भोसकले. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर दोन गटात तेढ निर्माण झाली. मंगळवारी मृतदेह अंत्यविधीसाठी स्मशानभूमीकडे नेला जात होता. त्यावेळी संतप्त नागरिकांनी हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी करीत, मृतदेह हल्लेखोरांच्या घरासमोर नेऊन ठेवला. सांगली ग्रामीणचे निरीक्षक किरण चौगले यांच्यासह फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
गावातील सर्व व्यवहार बंद
या घटनेचा निषेध करण्यासाठी अंकली गावातील सर्व व्यवहार मंगळवारी बंद ठेवले होते. गुन्हेगारांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. हल्लेखोरांची गावात दहशत असून ती पोलिसांनी मोडीत काढावी, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.