Sangli Crime : रोहित फाळके खूनप्रकरणी फरार संशयितास अटक

एकूण नऊजणांचा समावेश : दोन वर्षांनंतर कारवाई
Crime
Crime Pudhari
Published on
Updated on

तासगाव : वायफळे (ता. तासगाव) येथील ओंकार ऊर्फ रोहित फाळके याच्या खूनप्रकरणी फरार असलेल्या संशयितास अटक करण्यात तासगाव पोलिसांना यश आले. यश रमेश ढेबे (वय २३, रा. कात्रज) असे संशयिताचे नाव आहे, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक सचिन थोरबोले यांनी दिली.

ते म्हणाले, मुख्य संशयित विशाल फाळके व त्याच्या साथीदारांनी पूर्ववैमनस्य तसेच न्यायालयात सुरू असलेल्या वादाचा राग मनात धरून दि. १२ डिसेंबर २०२४ रोजी वायफळे येथे ओंकार ऊर्फ रोहित फाळके याच्यावर कोयता व तलवारीने वार करून त्याचा निर्घृण खून केला होता. त्याला वाचविण्यासाठी आलेले फिर्यादी संजय फाळके, त्यांची पत्नी जयश्री तसेच अशिष साठे, आदित्य साठे व सिकंदर शेख यांच्यावरही जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले होते.

तासगाव पोलिसात गुन्हा नोंद झाला होता. यापूर्वी पोलिसांनी विशाल सजन फाळके, अनिकेत संतोष खुळे, आकाश महिपती मळेकर, गणेश प्रकाश मळेकर, विकास ऊर्फ सोन्या गंगाराम राठोड, हर्षल संतोष चव्हाण, संदेश अरुण नायर तसेच एकास अटक केली होती, मात्र संशयित यश हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. संशयितास पकडण्यासाठी पोलिस निरीक्षक विशाल टकले यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकात पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब बदने, पोलिस हवालदार अमोल चव्हाण, पोलिस हवालदार सुहास खुबीकर तसेच कॉन्स्टेबल विवेक यादव यांनी सहभाग घेतला. पोलिस निरीक्षक विशाल टकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बदने, अमोल चव्हाण, अभिजित गायकवाड, सुहास खुबीकर, प्रशांत चव्हाण, विवेक यादव, सागर पाटील, अजय पाटील, इम्रान महालकरी व रेखा कोळी यांच्‍या पथकाने ही कारवाई केली.

तांत्रिक माहितीच्या आधारे सापळा रचला

संशयित यश याचा शोध सुरू असताना हवालदार अमोल चव्हाण यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीदारांच्या मदतीने आरोपीच्या वास्तव्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळविली. प्राप्त माहितीच्या आधारे संशयित हा टोकवडे पोलिस ठाणे हद्दीतील पळू, (ता. मुरबाड, जि. ठाणे) येथे वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार तासगाव पोलिसांचे विशेष पथक संशयिताच्या मागावर होते. पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण नियोजन करून सापळा रचत संशयितास ताब्यात घेऊन अटक केल्याचे थोरबोले यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news