Sangli Crime : सांगलीत गुंडाकडून १३ वर्षांच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या

कामगार ठेकेदारीचा वाद; बाजार समितीचे आजी-माजी संचालक बचावले
Sangli Crime News
वेदांत बंडगर, आरोपी नीलेश गडदे
Published on
Updated on

सांगली : आरग (ता. मिरज) येथील रेल्वे स्थानकातील मालधक्क्यावरील कामगार ठेक्याच्या वादाने गुरुवारी रक्तरंजित वळण घेतले. सांगलीतील अभयनगर-एसटी कॉलनी परिसरात वेदांत मारुती बंडगर (वय १३) या निष्पाप बालकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. गोळीबारावेळी घरात नसल्याने सांगली बाजार समितीचे संचालक मारुती बंडगर व त्यांचे वडील, माजी संचालक बाळासाहेब बंडगर हे थोडक्यात बचावले.

याप्रकरणी सराईत गुंड नीलेश गडदे व त्याच्या साथीदारांवर पोलिसांनी प्राथमिक संशय व्यक्त केला असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली आहेत. गडदे याने बुधवारी रात्री जत तालुक्यातील बाज येथेही गोळीबार करून १० लाखांची खंडणी मागितल्याचे तपासात समोर आले आहे.

कामगार व हमाल नेते बाळासाहेब बंडगर यांच्या कामगार संघटनेतील सहकारी लक्ष्मण खरात यांच्याकडे आरग रेल्वे धक्क्यावर माल उतरवण्याचा ठेका आहे. या ठेक्यावरून नीलेश गडदे आणि खरात यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता. या वादातून बुधवारी सायंकाळी नीलेश गडदे याने खरात यांचे मूळ गाव असलेल्या बाज (ता. जत) येथे जाऊन त्यांच्या पत्नीला, ‘नवऱ्याला मालधक्क्याचे काम सोडायला सांगा, अन्यथा १० लाख रुपये द्या, नाही तर मारून टाकीन’, अशी धमकी दिली होती. त्यानंतर गावातील अहिल्यादेवी चौकात गोळीबार केला होता. त्यानंतर गुरुवारी दुपारी गडदे आणि खरात यांच्यात पुन्हा वाद झाला. यावेळी गडदे याच्या वाहनावर दगडफेक करण्याचा प्रयत्न झाला होता.

घराबाहेर खेळत असताना...

दुपारच्या वादानंतर संतप्त झालेला नीलेश गडदे साथीदारांसह सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मोटारीतून सांगलीतील बंडगर यांच्या निवासस्थानी आला. त्यावेळी घरात बाळासाहेब बंडगर यांचे भाऊ आणि नातू वेदांत दोघेच होते. गडदे याने त्यांच्याकडे ‘बाळासाहेब बंडगर यांचे हेच का घर?’ अशी विचारणा करत थेट हवेत गोळीबार केला. यामुळे बंडगर यांचे भाऊ घरात पळाले. मात्र, याचवेळी घराबाहेर मोबाईलवर खेळत उभ्या असलेल्या वेदांतच्या डोळ्याजवळ गडदेने थेट गोळी झाडली. गोळीबार केल्यानंतर संशयित वाहनातून पसार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वेदांतला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news