

ईश्वरपूर : येथील अकबर मोहल्ला परिसरात सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी नवविवाहितेचा लोखंडी हत्याराने डोक्यात वार करून, तसेच गळा दाबून निर्घृण खून केल्याचे उघडकीस आले आहे.
शनिवारी या विवाहितेचा घरात संशयास्पद मृत्यू झाला होता. रविवारी या प्रकरणाचे गूढ उलगडले. जैनब मुजफर खान (वय २१) असे मृत विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी तिच्या पतीसह तिघांना अटक केली आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे. सर्व संशयितांवर हुंडाबळी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पती मारीफ ऊर्फ मुजफर रमजान खान (२१), सासरा मोहम्मद रमजान जमाल खान (४६), सासू साबीरा रमजान खान (४१, सर्व रा. अकबर मोहल्ला, ईश्वरपूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. यातील अल्पवयीन मुलीची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. याप्रकरणी जैनब हिचा भाऊ रिजवान मेहबूब खान (रा. नागपाडा, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे.
उत्तर प्रदेश येथे एप्रिल महिन्यात जैनब हिचा विवाह तिच्या नात्यातील मुजफर याच्याशी झाला होता. लग्नावेळी पाच लाख रुपये मानपानासाठी द्यायचे ठरले होते. लग्नावेळी जैनब हिच्या घरच्यांनी अडीच लाख रुपये दिले होते. काही दिवसांनंतर पती मुजफर, सासू साबीरा, सासरा रमजान हे घरातील किरकोळ कारणावरून जैनब हिला त्रास देऊ लागले. माहेरहून पैसे आणण्यासाठी मारहाण करू लागले. जैनबने सर्व हकीकत भावाला, आईला सांगितली होती. सासरच्या लोकांनी जैनब हिला हाकलून भावाकडे मुंबईला पाठवले होते. पैशासाठी वारंवार तगादा लावत होते. त्यानंतर ती ईश्वरपूर येथे सासरी नांदण्यासाठी आली होती.
संशयितांचा बनाव...
शनिवार, ८ ऑगस्टरोजी दुपारी मुजफर याने फोन करून जैनब हिचा भाऊ रिजवान याला जैनब हिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. अकबर मोहल्ला परिसरातील घरात जैनब ही बाथरूममध्ये घसरून पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचे पती मुजफरसह संशयितांनी सांगितले. दरम्यान, नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक संदीप पाटील, सहायक निरीक्षक हरिश्चंद्र गावडे, उपनिरीक्षक सोमनाथ घुगे, सतीश मिसाळ यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी जैनब हिच्या डोक्यावर गंभीर जखमा होत्या, गळ्यावर ओरखडे होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. तपासादरम्यान संशयितांनी विवाहितेचा खून केल्याचे समोर आले. संशयितांना रविवारी न्यायालयात हजर केले.
दोषींवर कारवाईसाठी मुस्लिम समाजाचे निवेदन
खुनाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी पोलिस ठाण्याच्या आवारात गर्दी केली होती. पोलिस निरीक्षकांना निवेदन दिले. या खुनाचा निःपक्ष तपास करावा, तांत्रिक बाबी तपासाव्यात, दोषींवर कठोर कलमानुसार कारवाई करावी, आदी मागण्या निवेदनाद्वारे केल्या.