Sangli Crime : सुट्या पैशाच्या वादातून बस वाहकाला मारहाण

ईश्वरपुरात कर्मचाऱ्यांचे तीन तास 'काम बंद' आंदोलन
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

ईश्वरपूर : ईश्वरपूर येथील बस आगारात सुट्या पैशांच्या वादातून बस वाहकाला तिघांनी बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी दुपारी घडली. मारहाणीत वाहकाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याने घटनेचे तीव्र पडसाद आगारात उमटले. संतापलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी सुमारे तीन तास 'काम बंद' आंदोलन केल्याने बस सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, ईश्वरपूर आगाराची बस कोल्हापूरकडून ईश्वरपूरकडे येत होती. बसमध्ये एका प्रवाशाचे वाहकाकडे १२ रुपये सुटे देणे बाकी होते. सुट्या पैशांवरून बसमध्येच दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. त्यावेळी वाहकाने, ‘माझ्याकडे सध्या सुटे पैसे नाहीत, बस डेपोमध्ये पोहोचल्यावर तिथून घेऊन देतो’, असे सांगितले. मात्र, बस ईश्वरपूर आगारात आल्यानंतर वाहक खाली उतरत असताना प्रवाशाने पुन्हा वाद घालण्यास सुरुवात केली. वाहकाने ‘मी तिकिटावर लिहून देतो, तुम्ही डेपोमधून पैसे घ्या किंवा मला सुटे पैसे द्या’, असे म्हटले असता प्रवाशाने त्याला थेट शिवीगाळ सुरू केली.

यानंतर संबंधित प्रवाशाने ईश्वरपूर येथील आपल्या मित्रांना फोन करून आगारात बोलावून घेतले. मित्र येताच वाहकाला गाठून वाद घालत थेट मारहाण सुरू केली, तर इतरांनी हुज्जत घालत शिवीगाळ केली. अचानक झालेल्या मारहाणीत वाहकाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली.

आपल्या सहकाऱ्यावर आगारातच हल्ला झाल्याची बातमी समजताच डेपोतील इतर चालक-वाहकांसह कर्मचाऱ्यांनी तत्काळ काम बंद आंदोलन पुकारले आणि आक्रमक पवित्र घेतला. दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी शेकडो कर्मचाऱ्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत ठाण मांडले. यामुळे आगारातील संपूर्ण बस सेवा सुमारे तीन तास ठप्प झाली होती आणि प्रवाशांचे मोठे हाल झाले.

दरम्यान, मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊ नयेत, यासाठी काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेतली. गुन्हा दाखल न करण्यावरून पोलिस ठाण्यात दोन्ही बाजूंनी मोठा खल झाला. अखेर, मारहाण करणाऱ्या संशयितांनी कर्मचाऱ्यांची जाहीर माफी मागितल्यानंतर आणि वैद्यकीय उपचाराची हमी दिल्यानंतर या वादावर पडदा पडला. यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आणि बससेवा पूर्ववत सुरू झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news