

मिरज : घरात दारू पिण्यास व मांसाहार करण्यास विरोध केल्याने जावयाने सासूला दगडाने मारहाण केली. यामध्ये सासू मेघना किशोर क्षीरसागर या जखमी झाल्या. याप्रकरणी जावई अक्षय रमेश कबाडे याच्याविरुद्ध महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मेघना आणि संशयित अक्षय हे नात्याचे सासू व जावई आहेत. मेघना या शहरातील खतीबनगर परिसरात राहण्यास आहेत. दि. 18 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास अक्षय हा सासुरवाडीस गेला होता. त्यावेळी घरात दारू पिण्यावरुन व मांसाहार करण्यावरून सासू मेघना यांच्याशी त्याचा वाद झाला. मेघना यांनी त्यास ‘तुम्हाला दारू प्यायची असेल आणि मांसाहार करायचा असेल, तर घराबाहेर जाऊन खाऊन या’, असे सांगितले. यावेळी अक्षय याने घराबाहेर पडलेल्या दगडाने मेघना यांच्या डोक्यात मारहाण केली. दगडाचा घाव वर्मी बसल्याने मेघना या जखमी झाल्या. याप्रकरणी त्यांनी जावयाविरुद्ध महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.