

चिंचणी/कडेगाव शहर : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी दोषी ठरलेला आरोपी अजित विजय जाधव (वय ३२, रा. तडसर, ता. कडेगाव) याला विटा येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यु. व्ही. इंदापुरे यांनी २० वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची सक्त शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त सहा महिने साधा कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
२ सप्टेंबर २०२२ ते २७ जानेवारी २०२३ या कालावधीत आरोपीने तलवारीने जिवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन पीडितेला रस्त्यालगतच्या पिकात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पीडिता व तिची आई अंगणात झोपलेली असताना, आरोपीने पीडितेचे तोंड दाबून तिला उचलून नेऊन पुन्हा अत्याचार केले. पीडिता गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने तिला जबरदस्तीने औषध व गोळ्या देऊन तिचा गर्भपात घडवून आणला होता.
या प्रकरणी चिंचणी-वांगी पोलिस ठाण्यात 'पोक्सो' कायद्याच्या कलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महादेव शिंदे व त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा सखोल तपास केला. सुनावणीदरम्यान एकूण सहा साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली, ज्यामध्ये पीडित मुलीची साक्ष अत्यंत निर्णायक ठरली. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील विनायक देशपांडे यांनी बाजू मांडली.
पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारावकर आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक झाडे यांनी सुनावणीच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन केले. या प्रकरणात कोर्ट पैरवी अधिकारी सहायक निरीक्षक मुदस्सर शेख, अंमलदार एस. बी. यादव, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र कवठेकर, एस. एस. जाधव तसेच पोलिस उपनिरीक्षक एस. एल. कलकुटगी व पी. जे. डांगे यांनी सहकार्य केले.