

सांगली : नात्यातील एका विवाहितेस सासरी सोडण्यासाठी मोटारीतून घेऊन जात असताना येथील बायपास पुलाखाली तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने संशयित सचिन सुरेश सूर्यवंशी (वय 45, रा. खोपडेनगर, कात्रज, पुणे) आणि संशयित कुणाल भरत कोंडे (वय 27, रा. गोकुळनगर, कात्रज, पुणे) यांच्याविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लग्नानंतर पीडिता सांगलीत माहेरी राहत होती. दि. 14 सप्टेंबर 2025 रोजी पीडितेच्या पतीकडील नातेवाईक सचिन सूर्यवंशी आणि पतीचा मित्र कुणाल कोंडे हे दोघे पीडितेकडे आले होते. त्यांनी पीडिता, तिचे वडील आणि बहीण यांना पीडितेस सासरी नांदण्यासाठी घेऊन जातो, असे सांगून पीडितेस मोटारीत बसविले. तेथून ते पुण्याच्या दिशेने निघाले. सांगलीतील बायपास पुलाच्या खालील बाजूस निर्जन ठिकाणी रात्री साडेआठच्या सुमारास मोटार थांबवली. तेथे पीडितेचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. त्यानंतर दोघा संशयितांनी पीडित विवाहितेवर लैंगिक अत्याचार केला. तसेच याबाबत कोठे सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे पीडितेने हा प्रकार कोणाला सांगितला नव्हता. परंतु आई- वडिलांशी चर्चा करून तिने शहर पोलिस ठाण्यात घडलेला प्रकार सांगून फिर्याद दिली.