Sangli Crime : तीस लाखांच्या विम्यासाठी दिली मेहुण्यानेच तीन लाखांची सुपारी

चोरोची येथील खुनाचा कवठेमहांकाळ पोलिसांकडून छडा; दोघांना अटक
Crime News
Crime News Pudhari
Published on
Updated on

कवठेमहांकाळ : चोरोची (ता. कवठेमहांकाळ) येथील विजापूर-गुहागर राज्यमार्गालगतच्या नाल्यात १९ मे रोजी दत्तात्रय भगवान चाबरे (वय ४५, रा. संजयनगर, सांगली) यांचा मृतदेह डोक्याचा चेंदामेंदा केलेल्या अवस्थेत मिळून आला होता. त्यांच्या खुनाचे गूढ उकलण्यात कवठेमहांकाळ पोलिसांना यश आले आहे. मेहुण्यानेच बहिणीला होत असलेल्या त्रासातून ३० लाख रुपयांच्या विमा रकमेसाठी चाबरे यांच्या खुनाचा कट रचल्याचे निष्पन्न झाले. तीन लाख रुपयांची सुपारी देऊन मारेकऱ्याकडून खून केल्याचे उघडकीस आले आहे.

या प्रकरणी संशयित मेहुणा रामचंद्र धनाप्पा खिलारे (रा. अष्टविनायक नगर, विश्रामबाग, सांगली) व सुपारी घेणारा तुकाराम मारुती सांगोलकर (रा. खैराव, ता. जत) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

चोरोची गावच्या पूर्वेला सुमारे दीड किलोमीटर अंतरावर नाल्यात डोक्याचा चेंदामेंदा झालेल्या अवस्थेत १९ मे रोजी दत्तात्रय चाबरे यांचा मृतदेह आढळून आला होता. घटनास्थळी, रस्त्यावर तसेच रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात रक्त पडले असल्याने, मृतदेह ओढत नेऊन नाल्यात टाकल्याचा संशय सुरुवातीपासून व्यक्त केला जात होता. खिशात सापडलेल्या ओळखपत्रावरून दत्तात्रय चाबरे यांची ओळख पटली होती.

दत्तात्रय चाबरे यांच्या नावावर असलेल्या सुमारे ३० लाख रुपयांच्या विमा रकमेचा लाभ घेण्यासाठी तसेच कौटुंबिक वादातून रामचंद्र खिलारे याने दत्तात्रय चाबरे यांच्या खुनाचा कट रचला. त्यासाठी त्याने तुकाराम सांगोलकर याला तीन लाख रुपयांची सुपारी दिली. या कामासाठी एक लाख रुपये ॲडव्हान्स स्वरूपात रोख दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने अत्यंत कौशल्याने तांत्रिक पुरावे, फॉरेन्सिक अहवाल आणि विविध धागेदोरे तपासत या खुनाचा छडा लावला. घटनास्थळी सापडलेले पुरावे, फॉरेन्सिक तपास, तांत्रिक माहिती आणि संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेत पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली.

काम मिळवून देण्याचे आमिष

रामचंद्र खिलारे याने ट्रकवर क्लिनर म्हणून काम मिळवून देतो, असे सांगितले होते. १७ मे २०२६ रोजी रात्री त्यांना तुंग (ता. वाळवा) येथे नेले. तेथे तुकाराम सांगोलकर हाही आला. तिघांनीही मद्यप्राशन केले. यावेळी रामचंद्र खिलारे याने तुकाराम याचा ट्रक असल्याचे सांगून दत्तात्रय यांना त्याच्यासोबत पाठवून दिले. दत्तात्रय यांना घेऊन तुकाराम चोरोची परिसरात आला. १८ मे रोजी त्याने दत्तात्रय चाबरे यांना दारू पाजून दिवसभर फिरवले. यानंतर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास चोरोचीजवळील प्रेम हॉटेल परिसरातील नाल्याजवळ त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. टॉमीसारख्या जड हत्याराने डोक्यावर, मानेवर आणि कानाखाली वार करून त्यांचा खून केला. पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह नाल्यामध्ये फेकून दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news