

कवठेमहांकाळ : नांगोळे (ता. कवठेमहांकाळ) येथील महिलेला पळवून नेल्याच्या आणि लव्ह-जिहाद असल्याच्या आरोपामुळे गावात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी संशयिताला अटक करावी म्हणून सकल हिंदू समाजाच्यावतीने आंदोलनाचा इशारा दिला होता.
सोमवारी संदीप गिड्डे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस ठाण्यावर ठिय्या आंदोलन केले. तणाव निर्माण झाल्याने संबंधित महिलेने नांगोळे येथील संशयित समीर पाटील याच्याविरोधात आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार दिली. तिची रवानगी आता महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालयात केली आहे.
तीन दिवसापूर्वी गावातील एका महिलेला संशयित समीर पाटील याने पळवून नेल्याची तक्रार संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे केली होती. त्यामुळे लव्ह-जिहादचा संशय येऊन नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला होता. याबाबत तीन दिवसानंतरही पोलिसांकडून कारवाई केली नव्हती. त्यामुळे सोमवारी सकाळी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. संशयिता ला तातडीने अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यानंतर संबंधित महिला पोलिस ठाण्यात हजर झाली. परंतु समीर पाटील याने पळवून नेल्याचे तिने काही मान्य केले नाही.
संशयिताने आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार तिने पोलिस ठाण्यात दिली. जत उपविभागीय अधिकारी सचिन थोरबोले यांनी आंदोलकांशी चर्चा केली. संबंधित महिला आणि तिचे नातेवाईक यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवला. संशयिताच्या चौकशीचे आश्वासन दिलेे, असे सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेतले.