

विटा :मालकाने विश्वासाने दिलेले तब्बल 1 कोटी 95 लाख रुपये किमतीचे सोने घेऊन एक कामगार पोबारा झाल्याची घटना बामणी (ता. खानापूर) येथे घडली आहे. याप्रकरणी विटा पोलिसांनी पृथ्वीराज भीमराव साळुंखे (वय 26, रा. अमरलक्ष्मी, कोडोली, ता. जि. सातारा) या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी परवीन बशीर मुलाणी (51, रा. बामणी, ता. खानापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी परवीन यांचे पती बशीर यांच्या दुकानात पृथ्वीराज हा कामगार होता. 25 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बामणी येथील राहत्या घरातून बशीर यांनी पृथ्वीराज याला विश्वासाने सोन्याचे दागिने/लगड आपला मुलगा जुबेर याला देण्यासाठी दिल्या होत्या. मात्र, त्याने ते सोन्याचे दागिने जुबेरला न देता, अन्यत्र कुठे तरी नेले आहेत. तीन सोन्याच्या लगडी त्याच्याकडे आहेत, ज्यांचे एकूण वजन अंदाजे 1564 ग्रॅम म्हणजे दीड किलोहून अधिक आहे.