

सांगली : येथील राम मंदिर चौकातील पंचमुखी मारुती रस्ता परिसरात गोळीबार करणारा सराईत गुन्हेगार टोल्या ऊर्फ प्रफुल्ल अरुण पोतदार (सम्राट व्यायाम मंडळाजवळ, सांगली) याच्यासह तिघांना मंगळवारी सायंकाळी घटनास्थळी बेड्या ठोकून खणभागात फिरवण्यात आले. टोल्यासह दिलावर ईलाही जमादार (सम्राट व्यायाम मंडळजवळ, सांगली), सुधीर ऊर्फ कांचा माळी (शामरावनगर, सांगली) या दोघांचा त्यात समावेश होता.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की संशयित टोल्या, दिलावर व कांचा राममंदिरजवळील पंचमुखी मारुती रस्ता परिसरात शुक्रवारी (दि. 17) थांबले होते. त्यावेळी नीलेश प्रमोद जाधव, त्याचा आतेभाऊ अजय माने तेथे आले. अजय हा टोल्याच्या मुलाच्या वाढदिवसाला आला नव्हता. यावरून दोघांत वादावादी झाली. वाद टोकाला गेल्यानंतर अजय माने याला ‘जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी टोल्याने दिली. दिलावरच्या कमरेला लावलेले पिस्तूल काढत हवेत गोळी झाडली. त्याचवेळी दिलावर कोयता घेऊन आला. टोल्याने अजयच्या दिशेने पिस्तूल रोखले. त्यावेळी नीलेश त्यांना रोखण्यासाठी गेला. तेव्हा, नीलेशवर गोळीबार करण्यात आला.
गोळी नीलेश याच्या गुडघ्याखाली लागून तो जखमी झाला. त्यानंतर टोल्या व साथीदारांनी पळ काढला. शहर पोलिसांनी पाठलाग करत टोल्यासह तिघांना जेरबंद केले. तिघेही पोलिस कोठडीत आहेत. या तिघांना मंगळवारी घटनास्थळी फिरवण्यात आले. पोलिस निरीक्षक अरुण सुगांवकर, उपनिरीक्षक सागर होळकर यांच्यासह गुन्हे प्रकटीकरणचे पोलिस यावेळी होते.