Sangli Crime: पुण्यातून वृद्धाचे अपहरण; सांगलीत आणून खून

मारहाण करणाऱ्या तीन संशयितांना सांगली पोलिसांकडून अटक
Sangli Crime: पुण्यातून वृद्धाचे अपहरण; सांगलीत आणून खून
Published on
Updated on

​सांगली : पुणे येथील वारजे, माळवाडी परिसरातील तपोधाम सोसायटीत राहणारे गोविंद माधवराव उपासे (वय ५९) या वृद्धाचे कारमधून जबरदस्तीने अपहरण करून, त्यांना सांगलीत आणून बेदम मारहाण करत त्यांचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने तत्परतेने कारवाई करत तीन संशयितांना जेरबंद केले आहे.

​वैभव ऊर्फ तातोबा केंगार (वय २८, रा. बेळंकी, ता. जत, मूळ रा. - आंबेगाव बी.के. बुद्रुक, पुणे), रोहन जयसिंग सावंत (वय २३, रा. यतगाव, ता. कडेगाव) आणि राहुल राजेंद्र बाबर (वय २५, रा. बेळंकी, ता. जत, मूळ - आंबेगाव बी.के. बुद्रुक, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

​पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथे राहणारे गोविंद उपासे हे १० ऑगस्टरोजी आंबेगाव बुद्रुक येथून बेपत्ता झाले होते. यासंदर्भात नांदेड सिटी पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, सांगली शहरातील १०० फुटी रोड, शामरावनगर परिसरात काही संशयितांनी एकाला आणून मारहाण केल्याची गुप्त माहिती सांगली शहर पोलिसांना मिळाली.

​या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवून तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या कडक चौकशीदरम्यान संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली. १० ऑगस्ट रोजी गोविंद उपासे यांना कारमधून (एमएच ५० एन ७०४१) जबरदस्तीने सांगलीतील शामरावनगर येथील जनावरांच्या गोठ्यात आणले होते. तेथे त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर उपासे यांना पुन्हा पुणे येथे सोडण्यासाठी घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास व पुढील कारवाईसाठी आरोपींना आंबेगाव पोलिस ठाणे (पुणे) यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

मृतदेह टेंभूच्या कॅनॉलमध्ये टाकला

पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने संशयितांनी मृतदेह कारमधून नेऊन कडेगाव ते कराड यादरम्यानच्या टेंभू कॅनॉलमध्ये फेकून दिला. हे तपासात उघड झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news