

मिरज : शहरातील कमानवेसमध्ये सराईत गुंड पिट्या भोरे आणि उदय माने यांच्या टोळ्यांमध्ये रविवारी मध्यरात्री जोरदार हाणामारी झाली. पिट्यावर हल्ला करण्यासाठी गेलेल्या उदयच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून धारदार हत्याराने त्याच्या हाताची बोटे तोडली. या घटनेनंतर ही टोळी पसार झाली.
पिट्या व उदय या दोघांमध्ये गणेश तलाव येथे वादावादी झाली होती. त्यानंतर पिट्या कमानवेस येथील घरी निघून गेला. परंतु, उदयने त्याच्या काही गुन्हेगार मित्रांना बोलावून घेतले. त्यानंतर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ते कमानवेस येथे पिट्यावर खुनीहल्ला करण्याच्या तयारीने गेले.
इकडे हल्ला होणार याची भनक लागल्याने पिट्याची टोळीदेखील प्रतिहल्ल्याच्या तयारीत होती. उदय माने, विनोद ढंग, अरुण गोसावी व पाचजणांच्या टोळीने कमानवेस परिसरात दहशत निर्माण करत गोंधळ घातला. दिसेल त्या वाहनांची तोडफोड करत उदय माने टोळी पिट्याच्या घरात घुसली. यावेळी त्याच्या घरातील साहित्याची तोडफोड करण्यात आली. यानंतर पिट्याच्या टोळीने उदय माने याच्या टोळीवर जोरदार हल्ला चढविला, तर उदयने घटनास्थळावरून पलायन केले.
पिट्या भोरे, ध्रुव भोरे, प्रवीण मोरे आणि प्रथमेश तांदळे या टोळीने उदयचा पाठलाग करून त्यास बेदम मारहाण केली आणि पलायन केले. मिरज शहर पोलिस निरीक्षक किरण चौगले, गुन्हे प्रकटीकरणचे सहायक निरीक्षक भैरवनाथ पाटील यांच्या पथकाने येऊन घटनास्थळाची पाहणी केली.
भोरे, तांदळेची दहशत
पिट्या भोरे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. प्रथमेश तांदळेनेही गेल्या महिन्यात एका दुकानावर हल्ला करून दहशत निर्माण केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला मारहाण करत फिरवले होते. परंतु, तांदळे याने पिट्या भोरे याच्या मदतीने खुनीहल्ला केल्याने त्यांची मिरजेत दहशत वाढली आहे.
घरात घुसून मारले
पिट्या भोरे याची मिरजेत मोठी दहशत आहे. परंतु, उदय माने याच्या टोळीने त्याच्या घरात घुसून त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला.