

कुपवाड : शहरातील कापसे प्लॉट अष्टविनायक कॉलनीतील पत्र्याच्या शेडमध्ये झालेल्या दगडू सुखदेव केंगार (वय 52) या सेंट्रिंग कामगाराच्या खूनप्रकरणी अटक केलेल्या संशयित शाहरुख फारुख मकानदार (वय 28, रा. जुना बुधगाव रोड, फकीरमळा, कुपवाड) याच्याविरोधात कुपवाड पोलिसांनी ॲट्रॉसिटीअंतर्गत वाढीव कलम लावले आहे.
दगडू केंगार हा दारू पिऊन पत्नी छबुताई केंगार हिच्याशी वारंवार भांडण करून तिला त्रास देत होता. रविवार दि. 5 एप्रिल रोजी रात्री या पती-पत्नी दोघांत भांडण झाले होते. भांडण झाल्यानंतर केंगार हा अलंकार कॉलनीमधील दत्तात्रय आळगीकर यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये एकटाच झोपायला गेला.
रविवारी मध्यरात्री केंगार हा झोपलेला असताना त्याची पत्नी छबुताई केंगार हिने तिच्या ओळखीचा सराईत गुन्हेगार शाहरुख मकानदार याला बोलावून घेतले. मकानदार याच्याजवळील धारदार चाकूने संशयित छबुताई व मकानदारने झोपलेल्या दगडू केंगार याच्या पायावर, पाठीवर, डोक्यात चाकूने सपासप वार करून त्याचा खून केला होता. मिरजेचे पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा तपास करीत आहेत.