Sangli Crime : सांगलीत बांधकाम कामगाराचा निर्घृण खून

दोन अल्पवयीन ताब्यात; मृतदेह बॅरेलमध्ये घालून विहिरीत टाकला
Sangli Crime News
सांगलीत बांधकाम कामगाराचा निर्घृण खून
Published on
Updated on

सांगली ः येथील इंदिरानगर झोपडपट्टी परिसरातील बेपत्ता बांधकाम कामगार रोहित मुकेश म्हैशाळे (वय 29) याचा निर्घृण खून झाल्याचे गुरुवारी उघडकीस आले. संशयितांनी धारदार हत्याराने वार करून रोहितचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह दगड भरलेल्या निळ्या रंगाच्या बॅरेलमध्ये घालून विठ्ठलनगर येथील एका पडीक विहिरीत फेकून दिला. आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या रोहितच्या खुनाचा छडा लावण्यात विश्रामबाग पोलिसांना यश आले. याप्रकरणी दोन अल्पवयीन संशयित ताब्यात आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रोहित हा इंदिरानगर परिसरात राहात होता. तो विवाहित होता. त्याला एक मुलगा, एक मुलगी आहे. सेंट्रिंगचे काम करणाऱ्या रोहितची आई महापालिकेत सफाई कामगार आहे. आई आजारी असल्याने बदली कामगार म्हणून तो कामाला जात असे. 26 फेब्रुवारी रोजीही सकाळी सात वाजण्याच्या सुमारास तो आईच्या जागी कामावर गेला. यादरम्यान जिल्हा परिषदेसमोर सकाळी त्याने वडिलांकडे पैसे मागितले. त्यानंतर काही वेळातच तिघे दुचाकीवरून तेथे आले. त्यांनी रोहितशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर रोहित पळत सुटला. त्यानंतर तो घरी परतला नव्हता.

तो बेपत्ता असल्याची नोंद विश्रामबाग पोलिसांत देण्यात आली. पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी तपास सुरू केला. इंदिरानगर परिसरातील दोन अल्पवयीन मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. दि. 26 रोजी संशयितांनी रोहितला दुचाकीवरून विठ्ठलनगर येथील एका शाळेजवळील निर्जन परिसरात नेले. तेथे त्याच्यावर धारदार हत्यारांनी वार केले. वर्मी वार झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर संशयितांनी त्याचा मृतदेह बॅरेलमध्ये घालून, त्यावर दगड भरून बॅरेल परिसरातील पडिक विहिरीत फेकून दिला.

दोघा संशयितांकडून ही माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी सकाळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयितांनी दाखवलेल्या विहिरीतून रोहितचा मृतदेह बाहेर काढला. तो सडलेला होता, मात्र तो रोहितचाच असल्याची खात्री झाली. अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर, पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव, संजीव झाडे, सहायक निरीक्षक कुमार पाटील व त्यांच्या पथकाने पंचनामा केला.

रोहितचा उत्तम मोहितेच्या खुनाशी संबंध?

रोहित म्हैशाळे याच्या खुनाचा आणि दलित महासंघाचा नेता उत्तम मोहिते याच्या खुनाचा काही संबंध आहे का, या दिशेने पोलिस तपास करत आहेत. उत्तम याच्या खुनादिवशी शाहरूख ऊर्फ शेरा रफीक शेख याचा त्याच्याच साथीदाराचा चुकून चाकू लागून मृत्यू झाला होता. या शेरा शेखला उत्तम याच्या वाढदिवसासाठी रोहितने बोलावून नेले होते. त्या रागातूनच रोहितचा काटा काढला गेला आहे का, या दिशेने पोलिस तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news