Sangli Burglary : फरार अट्टल घरफोड्यास अटक

६ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त
Burglary
BurglaryPudhari
Published on
Updated on

सांगली : दरोड्यासह खून, घरफोडी आणि जबरी चोरीसारख्या गंभीर ७ गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या आणि मोक्काअंतर्गत कारवाई झालेल्या रेकॉर्डवरील अट्टल संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. विशाल ऊर्फ मुक्या भीमराव पवार (वय ३५, रा. बहादूरवाडी, ता. वाळवा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून ६ लाख २ हजार ७६० रुपये किमतीचे ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे नक्षीदार दागिने जप्त केले आहेत.

संशयित विशाल पवार हा चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी आष्टा ते नागाव रस्त्यावर थांबल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरातील सह्याद्री मल्टीपर्पज लॉन्ससमोर सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ४० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन नक्षीदार बांगड्या आढळल्या.

अधिक चौकशीत, त्याने एका वर्षापूर्वी चार साथीदारांसह मर्दवाडी (ता. वाळवा) येथील एका घराची कौले काढून तिजोरी फोडल्याची आणि वाटणीला आलेल्या बांगड्या विकण्यासाठी आल्याची कबुली दिली. तपासात संशयित विशाल पवार हा जिल्ह्यातील आष्टा, पलूस, कुरळप आणि कुंडल पोलिस ठाण्यांतील घरफोडी व चोरीच्या ७ गुन्ह्यांमध्ये फरार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर यापूर्वी दोनदा ‘मोक्का’अंतर्गत कारवाई झाली असून सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत त्याच्यावर गंभीर गुन्हे नोंद आहेत.

पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे व त्यांच्या पथकाने कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news