

सांगली : रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य, ड्रेनेज या सुविधा नागरिकांना प्रभावीपणे मिळाल्या पाहिजेत. हे विषय प्राधान्याचे राहतील. शहर स्वच्छ व सुंदर बनवण्यावर भर राहील. त्याचबरोबर अतिक्रमण, अनधिकृत खोकी याविरोधातील कारवाई चालू राहील. वाहतुकीला अडथळा ठरणारी खोकी हटवण्यापूर्वी त्यांच्या पुनर्वसनाचा पर्याय दिला जाईल. थेट कारवाईऐवजी आधी पर्याय, मग बुलडोझर हे तत्त्व अवलंबले जाईल, अशी भूमिका महानगरपालिकेच्या नूतन आयुक्त संजीता महापात्र यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
नूतन आयुक्तसंजीता महापात्र यांनी बुधवारी पदभार स्वीकारला.आ. सुधीर गाडगीळ तसेच पदाधिकारी, अधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले. आयुक्त महापात्र म्हणाल्या, सांगली, मिरज आणि कुपवाड ही तिन्ही शहरे त्यांच्यापरीने विकसित झाली आहेत. महापालिकेच्या विकास आराखड्याचा आधार घेऊन शहर नियोजनाचा प्रश्न सोडवला जाईल. शहर विकास, शहर स्वच्छ, सुंदर करण्यासाठी महापालिकेबरोबर नागरिकांची भूमिकाही महत्त्वपूर्ण आहे. नागरिकांना मूलभूत सेवा-सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्यावर भर राहील. सत्यम गांधी यांनी चालवलेली अतिक्रमणावरील कारवाई सुरूच ठेवू. त्यानंतरही पुन्हा तिथेच अतिक्रमण झाले असेल तर कारवाई केली जाईल.
मॉडेल स्कूल उभारणार
आयुक्तसंजीता महापात्र म्हणाल्या, अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असताना शिक्षण क्षेत्रात चांगले काम करता आले. तिथे शाळांची संख्या मोठी आहे. महापालिकेच्या 53 शाळा आहेत. इथे महापालिकेच्य शाळांची संख्या कमी असली तरी त्यांची अवस्था बिकट आहे. पटसंख्या कमी आहे, अशी माहिती मिळाली. महापालिकेच्या शाळांचा दर्जा उंचावला जाईल. पहिल्या टप्प्यात किमान 10 आदर्श शाळा घडवू. सीएसआर फंडातून मॉडेल स्कूल उभारण्यासाठी प्रयत्न केला जाईल.