

स्वप्निल पाटील
मिरज : कुपवाडमधील केसरेकर दाम्पत्य हत्याकांडातील संशयित फरीद शेख याच्यावरील हल्ल्याचा प्रयत्न सोमवारी पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. सुरुवातीला वेशांतर करून त्याला न्यायालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र हल्ल्याचा धोका लक्षात येताच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना चकवा देत न्यायालयासमोर ऑनलाईन हजर करून त्याची सांगली कारागृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान, न्यायालय आणि कारागृह आवारात हिंदुत्ववादी कार्यकर्ते जमल्याने दंगल नियंत्रण पथकासह मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला.
कुपवाड येथील मनीषा केसरेकर आणि मोहन केसरेकर या दाम्पत्याच्या खूनप्रकरणी अटक केल्यानंतर फरीद शेख याला न्यायालयाने सात दिवस पोलिस कोठडी दिली होती. सोमवारी शेख याची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार होते. न्यायालयात हजर करीत असताना त्याच्यावर पोलिस बंदोबस्ताच हल्ला करण्याच्या प्रयत्नात हिंदुत्ववादी कार्यकर्ते होते. याची कुणकुण लागताच पोलिसांनी सुरुवातीला वेशांतर करून त्याला न्यायालयासमोर हजर करण्याचा प्रयत्न केला. परंतु, न्यायालयासमोर हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमल्याची माहिती मिळाल्याने अखेर त्याला ऑनलाईन न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. यानंतर कुपवाडमधून त्याच्या पाळतीवर असणार्या, न्यायालय आणि कारागृह आवारातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना चकवा देत पोलिसांनी त्याची सांगली कारागृहात रवानगी केली. फरीद कारागृहात पोहोचल्याचे समजल्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी न्यायालय व कारागृहाच्या आवारातून काढता पाय घेतला. ऐनवेळी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून हल्ला होणार, असे समजल्यानंतर पोलिसांनी ‘प्लॅन चेंज’ केला. परंतु, नाट्यमय घडामोडींमुळे पोलिसांची तारांबळ उडाली होती.