

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका निवडणुकीसाठी शासन निर्णय व वेळापत्रकानुसार प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव नगरविकास विभागाला सादर होणार आहे. दरम्यान, महापालिकेच्या सदस्य संख्येत बदल झालेला नाही. प्रभागातील सदस्य संख्याही कायम राहिलेली आहे. त्यामुळे महापालिकेच्या 2025 च्या निवडणुकीसाठी 2018 च्या निवडणुकीनुसार प्रभाग रचना असेल, असे जाणकारांनी सांगितले.
नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी हिरवा कंदील दाखवला आहे. लातूरमधील औसा नगरपालिकेसंदर्भातील नवीन प्रभाग रचनेवर आक्षेप घेणारी याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. या पार्श्वभूमीवर सांगली महापालिका निवडणूक प्रभाग रचना पुन्हा चर्चेत आली आहे. दरम्यान, महापालिकेची 2018 ची निवडणूक 4 सदसीय प्रभागानुसार आणि 27 टक्के ओबीसी आरक्षणानुसार झाली होती. आता 2025 ची निवडणूकही 4 सदसीय प्रभागानुसार आणि 27 टक्के ओबीसी आरक्षणानुसार होणार आहे. त्यामुळे 2018 च्या निवडणुकीतील प्रभाग रचनाच 2025 च्या निवडणुकीत राहील, असे जाणकारांकडून सांगितले जात आहे.
शासनाने यापूर्वीच महापालिकांच्या प्रभाग रचनेकरिता वेळापत्रक प्रसिद्ध केलेले आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. प्रारूप प्रभाग रचनेचा मसुदा तयार करून त्यावर समितीने स्वाक्षरी करण्याचा कालावधी 25 जुलै ते 7 ऑगस्ट 2025 आहे. प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव नगरविकास विभागास सादर करण्याचा कालावधी 8 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट 2025 आहे. जिल्हाधिकारी हे संबंधित महापालिका आयुक्तांमार्फत नगरविकास विभागाला प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव सादर करणार आहेत. प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्धी व त्यावर हरकती, सूचना मागवण्याचा कालावधी 3 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर 2025 आहे. अंतिम प्रभाग रचना प्रसिद्धीचा कालावधी 9 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर 2025 हा आहे.