Sangli News : आराखड्यानुसार काम न झाल्यास काळ्या यादीत

आयुक्तांचा सांगली, मिरज ड्रेनेज ठेकेदाराला इशारा : कुपवाडमधील खराब रस्त्यांची आज संयुक्त पाहणी
Sangli Municipal Corporation
Sangli Municipal CorporationPudhari Photo
Published on
Updated on

सांगली : सांगली, मिरज ड्रेनेज योजनेचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासंदर्भात कृती आराखडा तयार करून गुरुवारी सादर करा. या आराखड्यानुसार कार्यवाही न झाल्यास काळ्यात यादीत समाविष्ट करण्याबाबत शासनाला प्रस्ताव पाठवला जाईल, असा इशारा आयुक्त संजीता महापात्र यांनी ठेकेदारास दिला. कुपवाड ड्रेनेज योजनेंतर्गत ड्रेनेजलाईनसाठी खोदाईमुळे रस्ते चिखलमय झाल्यावरून नगरसेवकांनी संताप व्यक्त केला होता. त्याअनुषंगाने गुरुवारी ड्रेनेज विभाग, बांधकाम विभाग व एमजेपीच्या अभियंत्यांनी स्थानिक नगरसेवकांच्या उपस्थितीत संयुक्त पाहणी करावी, असे आदेशही आयुक्त महापात्र यांनी दिले.

महापालिकेत बुधवारी सांगली, मिरज तसेच कुपवाड ड्रेनेज योजनेची आढावा बैठक झाली. आयुक्त संजीता महापात्र, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे, एमजेपीचे उपअभियंता ए. डी. चौगुले (सांगली), उपअभियंता सुशांत कुलकर्णी (मिरज), नगरसेवक संजय मेंढे, विष्णू माने, दिग्विजय सूर्यवंशी, अभिजित भोसले, साक्षी बोरगावे, प्रार्थना शिंदे, करण जामदार, डॉ. म्हेत्रे तसेच ड्रेनेज योजनेच्या ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सांगली, मिरज ड्रेनेज विभागाचे काम रखडले आहे. अनेकदा मुदतवाढ देऊनही काम पूर्ण होईना झाले आहे. दोन्ही योजनांची ९० ते ९५ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. मात्र राहिलेली ५ ते १० टक्के कामच महत्त्वपूर्ण आहे. या कामांअभावी संबंधित भागातील ड्रेनेज कार्यान्वित झालेले नाही. त्यावरून आयुक्तांनी ठेकेदार कंपनीचा प्रतिनिधी व एमजेपीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. काम पूर्ण करण्यासाठी कृती आराखडा तयार करा, तो गुरुवारीच सादर करा. कृती आराखड्यानुसार काम न झाल्यास ठेकदार कंपनीला काळ्या यादीत समाविष्ट करण्यासाठी शासनाला प्रस्ताव सादर केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

कुपवाड ड्रेनेज योजनेंतर्गत ड्रेनेज लाईनसाठी खोदाईमुळे रस्ते चिखलमय झाल्याची तक्रार नगरसेवकांनी केली. त्यावर ड्रेनेज, बांधकाम व एमजेपीच्या अभियंत्यांनी नगरसेवकांसमवेत गुरूवारी प्रत्यक्ष पाहणी करावी, असे आदेश आयुक्त महापात्र यांनी दिले. कुपवाड ड्रेनेज योजनेचे काम गतीने व्हायला पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, मिरज ड्रेनेज योजनेत मेघजीभाईवाडी परिसराचा डीपीआरमध्ये समावेश होता. मात्र उतार नसल्याने तेथील काम करण्यात आले नसल्याकडे आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आले. त्याबाबतही आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

कुपवाड ड्रेनेज योजनेंतर्गत ड्रेनेज लाईन व हाऊस चेंबरसाठी अतिरिक्त ५१ कोटी रुपयांचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी सादर झालेला आहे. त्यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सांगली, मिरज आणि कुपवाड ड्रेनेज योजनेसंदर्भात ३ ऑगस्टरोजी पुन्हा बैठक होणार आहे. त्या बैठकीत कामांचा पुन्हा आढावा घेतला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news